Wardha News : पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची लूट, वर्धा पोलिसांनी आवळल्या चौघांच्या मुसक्या
Wardha Crime News : पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना वर्धा पोलिसांनी अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातून अटक केली.
Wardha News Update : वृद्धाला लुटणाऱ्या टोळीतील चार जणांना वर्धा पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस असल्याचे सांगून वृद्धाला अंगावरील सोने काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले व बोलण्यात गुंतवून या टोळक्याने त्यांच्याकडील पिशवी पळवली होती. 9 मे रोजी वर्ध्यातील पाषाण चौकात ही घटना घडली होती. अली रजा उर्फ अली बाबा शब्बीर बेग ईराणी (वय 47, रा. अहमदनगर) , शेख शाहरुख रईस (वय 28 रा.अहमदनगर ), रियाज रशीद शेख (वय 35 रा.औरंगाबाद ) आणि अविनाश लक्ष्मण गायकवाड ( वय 29 रा. अहमदनगर ) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.
वर्ध्यातील पाषाण चौकातून अशोक राजेश्वर मरडवार यांना अडवून पोलीस असल्याची बतावणी करण्यात आली. सध्या वातावरण खराब असून पुढे खून झाला आहे, मारामारी सुरू आहे, तुम्ही पुढे जाऊ नका, तुमच्याजवळ असलेले सोने काढून पिशवीत ठेवा असे सांगून मरडवार यांना अंगावरील सोन्याचा गोफ, सोन्याची अंगठी असे 75 हजार रुपयांचे सोने पिशवीत ठेवू गाडीच्या हुकाला लटकवून ठेवण्यास सांगितले. यावेळी मरडवार यांना बोलण्यात गुंतवून गाडीला अडकवलेली सोन्याची पिशवी पळवून नेण्यात आली. मरडवार यांनी याबाबत वर्धा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला होता. आज अहमदनगर जिल्ह्यातून चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातून चार आरोपींना अटक केली. वर्धा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सोन्याचा गोफ आणि सोन्याच्या अंगठ्यांसह एक कार, एक दुचाकी, मोबाईल्स असा आठ लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोलंकी, उपविभागीय पोलीस अधीकारी पियुष जगताप, यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार, स्थानिक गुन्हे शाखेचे संजय गायकवाड, सलाम कुरेशी, सचिन इंगोले, दिपक जंगले, अविनाश निंबाळकर, अमोल लगड, हमीद शेख, चंदु बुरंगे, श्रीकांत खडसे, दिनेश बोधकर आणि मनिष कांबळे सहभागी होते.