(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vasai Crime : बँकांनी सील केलेली घरं स्वस्तात देण्याचं आमिष, कोट्यवधींची फसवणूक करणारी टोळी गजाआड
Vasai Crime : आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाच स्वप्न असतं. हेच स्वप्न हेरुन एका टोळीने मुंबई, ठाण्यासह वसई विरारमध्ये 157 लोकांची 3 कोटी 75 लाखाची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे.
Vasai Crime : बँकांनी सील केलेली घरं (House) स्वस्त दरात तडजोडीने मिळवून देण्याचा बहाणा करुन, सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीला गजाआड करण्यात गुन्हे शाखेच्या (Crime Branch) कक्ष क्रमांक 3 ला यश मिळालं आहे. यात एक महिला आणि वकिलासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने वसई विरार (Vasai Virar), मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) शहरातील आतापर्यंत 157 नागरिकांची 3 कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक केल्याच उघड झालं आहे.
आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाच स्वप्न असतं. हेच स्वप्न हेरुन एका टोळीने मुंबई, ठाण्यासह वसई विरारमध्ये 157 लोकांची 3 कोटी 75 लाखाची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. या टोळीत दोन वकीलही सहभागी आहेत. ही टोळी वेगवेगळ्या बोगस कंपनी स्थापन करुन, बँक लिलावातील स्वस्त दरात प्लॅट उपलब्ध असल्याची जाहिरात देऊन, सर्वसामान्य माणसांची फसवणूक करत होती.
स्वस्तात घर देण्याचं आमिष
विरार पश्चिम बोलींज या पत्त्यावरील बिल्डर्स विनर्स या कंपनीची त्यांनी स्थापना केली. जून 2021 ते मार्च 2022 या कालावधीत बँकेने लिलावात काढलेली मालमत्ता, घरे, एनपीए तत्वावर स्वस्तात तडजोडी अंती विकण्याचे आमिष दाखवून या टोळीने नागरिकांचा विश्वास संपादन केला आणि 44 नागरिकांची 80 लाख रुपयांना फसवणूक केली. या प्रकरणी 56 वर्षीय पियुषकुमार दिवाण यांनी 28 मार्च 2022 रोजी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर गन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींविरोधात भादंवि कलम 420, 406, 465, 467, 34 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितासबंधाचे रक्षण अधिनियम 1999 चे कलम 3, 4, प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. याचाच तपास गुन्हे शाखा कक्ष 3 करत असताना, त्यांच्या हाती ही टोळी लागली.
टोळीतील दोन जण पेशाने वकील
परवेझ दस्तगिर शेख उर्फ राहुल भट उर्फ पीटर सिक्वेरा, उर्फ असिफ सय्यद (वय 31 वर्षे), सोहेब हुसेन शेख उर्फ नितीन शर्मा उर्फ प्रशांत बन्सल उर्फ सोहेल शेख (वय 28 वर्षे), प्रवीण मल्हारी ननावरे आणि हिना इकबाल चुडेसरा उर्फ हिना सय्यद असे अटक आरोपींची नाव असून, हे आरोपी मिरारोड, भाईंदर, ठाणे कळवा खारगाव, काशीमीरा या परिसरातील राहणारे आहेत. ही टोळी नेहमी आपली नावे बदलत होती. यातील सोहेब आणि परवेज हे पेशाने वकील होते.
ठाणे आणि मुंबईतील नागरिकांना कोट्यवधींचा गंडा
या टोळीने लँड लॅडर नावाची कंपनी स्थापन करुन, ठाण्यातील जी बी रोड कापूरबावडी इथल्या 40 नागरिकांची 1 कोटी 20 लाख रुपयांना फसवणूक केली. त्याचबरोबर मुंबईच्या आझाद मैदान इथे पाटील डिजिटल कंपनी स्थापन करुन, तिथल्या 72 नागरिकांची 1 कोटी 75 लाख रुपयांना फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
अटक केलेल्या आरोपींविरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाणे विरार, मुंबई आझाद मैदान आणि ठाणे शहरातील चितळसार मानपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमन्वय गुन्हे दाखल आहेत.