(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फ्रीमध्ये पाणीपुरी खायला घालण्याचा टोळ्याकडून आग्रह, नकार दिल्यानं जबर मारहाण, व्यक्तीचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये फुकटात पाणीपुरी न दिल्यानं जबर मारहाण करण्यात आली. रुग्णालयात उपचारादरम्यान पाणीपुरी विक्रेत्याचा मृत्यू झाला.
Crime News: कदाचितच कोणी असेल, ज्याला पाणीपुरी (Panipuri) आवडत नाही. पण याच पाणीपुरीमुळे एक व्यक्ती आपल्या जीवाला मुकला आहे. उत्तर प्रदेशात एका पाणीपुरीवाल्यानं फ्रीमध्ये पाणीपुरी न दिल्यामुळे त्याला जबर मारहाण करण्यात आली. याच मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्याच्या आधारे कारवाई केली जाईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
कानपूर देहात येथील मुसानगर येथे राहणारे 40 वर्षीय प्रेमचंद निषाद हे पत्नी शशी देवी, मुलगा अनुज, मुलगी मानसी, प्रियांशी आणि दिव्यांशी यांच्यासह चाकेरी येथील सफीपूर मध्ये कैलाश चंद्र यांच्या घरात भाड्यानं राहत होते. आपला आणि कुटुंबाचा उदर्निवाह चालवण्यासाठी प्रेमचंद पाणीपुरीचा गाडा चालवत होते. पण उदर्निवाहासाठी सुरू केलेला पाणीपुरीचा गाडाच त्यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला.
टोळक्यानं थांबवलं अन् केला फ्रीमध्ये पाणीपुरी देण्याचा आग्रह
प्रेमचंद्र हातगाडीवर पाणीपुरी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. रविवारी रात्री उशिरा मृत प्रेमचंद्रनं आवराआवर करुन पाणीपुरीची गाडी बंद केली. घरी परतत असतानाच सफीपूर वळणावर उभ्या असलेल्या टोळक्यानं त्यांना अडवलं आणि फ्रीमध्ये पाणीपुरी खायला घालण्याचा आग्रह करू लागले, असा आरोपी कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीतून करण्यात आला आहे.
गुंडांची शिवीगाळ करून बेदम मारहाण
प्रेमचंद यांनी याचा निषेध केला. त्यानंतर टोळक्यानं शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. टोळक्याच्या तावडीतून कसेबसे सुटून प्रेमचंद घरी पोहोचले आणि त्यांनी घडलेला सर्व प्रकार पत्नीला सांगितला. त्यानंतर रात्री अचनाक त्यांची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेलं. सर्वात आधी त्यांना एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथून त्यांना पुढच्या उपचारांसाठी उर्साला नेण्यात आलं.
उपचारादरम्यान सोडला जीव
तिथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कुटुंबीयांच्या आरोपांवरून घटनेची माहिती मिळताच पोलीस दुसऱ्या दिवशी सकाळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. कुटुंबीयांनी टोळक्यावर लिंचिंगचा आरोप केला आहे.
चकेरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अशोक दुबे यांनी सांगितलं की, प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, मृताच्या शरीरावर कोणत्याही बाह्य दुखापतीच्या खुणा आढळल्या नाहीत, ज्यावरून त्याला मारहाण करण्यात आल्याचं दिसून येत आहे. कारण ज्या व्यक्तीवर हत्येचा आरोप आहे, त्या व्यक्तीनं मृताच्या पुतण्याविरुद्ध एससी-एसटीसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.