परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने महिलांची फसवणूक, काशिमीरा पोलिसांकडून दोघांना बेड्या
Crime News : परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने महिलांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना काशिमीरा पोलीसांनी अटक केली आहे
Crime News : परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने महिलांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना एका एनजीओच्या मदतीने काशिमीरा पोलीसांनी (Kashmiri police) अटक केली आहे. अशरफ मैदु कैवारी आणि नमीता सुनिल मालुसरे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ही टोळी ओमान-मस्कत देशात घरकामाच्या नोकरीचे दरमहा 30,000 रुपये पगाराचे आमिष देवून तेथे महिलांची विक्री करायचे असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
काशिमीरा पोलिसांनी अटक केलेले हे दोघे आरोपी भारतीय महिलांना ओमान-मस्कत देशात घरकामाच्या नोकरीचं अमिष दाखवून त्यांचा सौदा करायचे. घरकामाचे महिना तीस हजार रुपये मिळतील असे सांगायचे. नोकरीच्या निमित्ताने हे संशयीत पीडित महिलांना ओमान देशात तीन लाख रुपयांना विकायचे. ज्यांनी या महिलांना विकत घेतलं आहे ते जे काही काम सांगतील ते त्यांना करावं लागत होतं. या महिलांना भारतात परत जायचे असल्यास त्यांना तीन लाख रुपयांची मागणी केली जायची. त्यासाठी त्यांचा पासपोर्ट स्वतःकडे ठेवून घेतला जात असे. अशा प्रकारे कित्येक महिलांची फसवणूक या एजंटने केली होती.
काशिमीरा येथे राहणाऱ्या संगीता पाटील यांच्या संपर्कात या महिला आल्यानंतर पाटील यांनी या महिलांची सुटका करण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. ओमान देशातील छत्रपती मराठा साम्राज्य या संघटनेची त्यांनी मदत घेतली. ओमान देशात पाटील यांना तेथील एंजटने एका बंद रुममध्ये इतर महिलासोबत डांबून ठेवलं. त्यांनी घरातील भिंतीच्या ए.सी. काढून तेथून पाच ते सहा महिलांन बाहेर काढले. त्यानंतर छत्रपती मराठा साम्राज्य संघटनेच्या मदतीने भारतीय दूतावासासोबत संपर्क साधून या सर्व महिलांना भारतात परत आणलं.
या सर्व महिला भारतात परतल्यानंतर भारतातील एंजटवर काशिमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर काशिमीरा पोलिसांनी अशरफ मैदु कैवारी आणि नमीता सुनिल मालुसरे या दोघांना अटक केली आहे. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन काशिमीरा पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे.
अटक करण्यात आलेल्या टोळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का? याबरोबरच ओमानमध्ये आणखी किती महिला आहेत याची माहिती पोलिस घेत आहेत. ही घटना गंभीर असून याचा कसून तपास केला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या