(Source: ECI/ABP News/ABP Majha)
4 तासांसाठी बुक केली OYO रूम, पण जोडपं बाहेर आलंच नाही, पोलिसांनी दार उघडताच..., नेमकं घडलं काय?
दिल्लीतील ओयो हॉटेलच्या खोलीत दोन मृतदेह सापडले आहेत. यात एक विवाहित महिला आणि तिचा प्रियकर आहे. पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. दोघांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतल्याचं लिहिलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
Delhi Crime News: दिल्लीतील (Delhi News) एका घटनेनं संपूर्ण शहर हादरुन गेलं आहे. दिल्लीतील जाफराबाद (Jafrabad) येथील ओयो हॉटेलच्या (OYO Hotel) खोलीत दोन मृतदेह आढळून आले. यात एक मृतदेह विवाहित महिलेचा आणि दुसरा तिच्या प्रियकराचा आहे. दोघांनी चार तासांसाठी ओयो हॉटेलवर रूम बुक केली होती. परंतु, वेळ उलटून गेल्यानंतरही दोघांनी दरवाजा न उघडल्यानं हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. पोलिसांना हॉटेलच्या रुममध्ये दोन मृतदेह आणि त्या शेजारीच एक सुसाईड नोट आढळून आली.
मौजपूर मेट्रो स्टेशनजवळील ओयो हॉटेलमधून रात्री 8 वाजून 5 मिनिटांनी पोलिसांना घडल्या प्रकारा संदर्भात माहिती मिळाली. पोलीस पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. यादरम्यान, सोहराब (वय 28 वर्ष) मेरठचा रहिवासी आणि आयशा बसंत कुंज गल्ली क्रमांक-10, लोणी येथील रहिवाशी या दोघांनी दुपारी 1 वाजता हॉटेलमध्ये चेक इन केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
दोघांनी 4 तासांसाठी बुक केलेली रूम
दोघांनी 4 तासांसाठी रूम बुक केली होती. मात्र, त्यांची वेळ संपल्यानंतरही बराच वेळ दोघे रुमबाहेर न आल्यामुळे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी 7 वाजून 45 मिनिटांनी दरवाजा ठोठावला. मात्र, रुमच्या आतून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी यासदंर्भात पोलिसांना कळवलं. पोलीस आल्यानंतर त्यांच्या समक्ष रुमचं दार उघडण्यात आलं.
रुमचा दरवाजा उघडल्यानंतर समोर धक्कादायक दृष्य पाहायला मिळालं. रुममध्ये दाखल झालेल्या टीमला सोहराब नायलॉनच्या दोरीनं पंख्याला लटकत असल्याचं पाहायला मिळालं. तर आयशा बेडवर मृतावस्थेत आढळून आली. आयशाच्या मानेवरही जखमेच्या खुणा आढळल्या. तसेच, तिच्या शेजारी पलंगावर अर्ध्या पानाची सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये दोघांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं लिहिलं होतं. त्यात दोघांनी एकत्र जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचं लिहिलं होतं. अद्याप दोघांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत काहीच माहिती मिळालेली नाही.
आयशाच्या पतीची कसून चौकशी
आयशाला दोन मुलं असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. एक 9 वर्षांचा मुलगा आणि 4 वर्षांची मुलगी अशी दोन मुलं आहेत. तिचे पती मोहम्मद गुलफाम (28 वर्ष) हे जिम प्रोटीन सप्लिमेंट विकतात. पोलिसांनी याप्रकरणी आयशाच्या पतीची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांकडून सोहराबच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात असून, पोस्टमार्टमनंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी स्थानिक रुग्णालयात पाठवले आहेत. दोघांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :