Ghatkopar Bomb blast | सरकारने अन्याय केला, आम्ही हायकोर्टात दाद मागणार; पोलिसांच्या नियुक्तीवर आरोपी ख्वाजा युनूसच्या आईची प्रतिक्रिया
घाटकोपर मध्ये 2002 साली झालेल्या बॉम्ब स्फोट प्रकरणी परभणीतील ख्वाजा युनूस या आरोपीचा मृत्यू हा कस्टडीतच झाला असा दावा पोलिसांनी केला होता. या प्रकरणी ख्वाजा युनूसच्या कुटुंबाने मुंबई पोलिसांविरोधात न्यायालयीन लढा लढून हे प्रकरण तडीस लावले होते.
परभणी : माझा मुलगा ख्वाजा युनूस हा निर्दोष होता, तरीही त्याला 2002 च्या घाटकोपर बॉम्ब स्फोटात अडकवून कस्टडीतच मारण्यात आले. ज्यांनी माझ्या मुलाला मारले त्यांनाच सरकारने पुन्हा नियुक्त करून आमच्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे याच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया ख्वाजा युनूसची आई आशिया बेगम यांनी दिली आहे.
घाटकोपर मध्ये 2002 साली झालेल्या बॉम्ब स्फोट प्रकरणी परभणीच्या ख्वाजा युनूस या तरुणाला अटक करण्यात आली होती. तसेच अटकेत असतानाच त्याचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला होता. परंतु ख्वाजा युनूस हा तपासा दरम्यान पळून गेल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला होता. या प्रकरणी ख्वाजा युनूसच्या कुटुंबाने मुंबई पोलिसांविरोधात न्यायालयीन लढा लढून हे प्रकरण तडीस लावले होते. खटला सुरु झाल्यानंतर एका महिन्यातच सिद्ध झाले होते की, ख्वाजा युनूसचा मृत्यू हा कस्टडीतच झाला याच प्रकरणातील एपीआय सचिन वझे, पोलीस कर्मचारी राजाराम निकम, राजेंद्र निकम, सुनील देसाई यांच्या विरोधात गेल्या 17 वर्षांपासून खटला न्यायालयात सुरु आहे. अशातच त्यांना सरकारने इतक्या वर्षानंतर पुन्हा सेवेत रुजू करून घेतल्याने ख्वाजा युनूसच्या कुटुंबाने यावर संताप व्यक्त केला आहे. सरकारने न्यायालयाच्या निकालाची वाट पाहायला हवी होती, ज्यांनी माझ्या मुलाला मारले त्यांनाच अशा प्रकारे सेवेत रुजू करून घेत आमच्या कुटुंबावर मोठा अन्याय करण्यात आला आहे. मात्र तरीही आम्ही गप्प बसणार नाही. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागू अशी प्रतिक्रिया ख्वाजाची आई आशिया बेगम यांनी दिली आहे.
कोण होता ख्वाजा युनूस?
ख्वाजा युनूस सय्यद ख्वाजा अय्युब, हा मुळचा परभणीचा. औरंगाबादच्या MIT महाविद्यालयातून त्याने इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. त्यानंतर शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी थेट दुबई गाठली होती. डिसेंबत 2002मध्ये कामवरून सुट्टी घेऊन तो दुबईहून परभणीला राहत्या घरी परतला होता. त्याच दरम्यान, 2 डिसेंबर 2002 साली मुंबईतील घाटकोपर येथे बॉम्बस्फोट झाला होता. याप्रकरणी तपास करताना 24 डिसेंबरला अमरावतीच्या चिखलदरा येथून ख्वाजा युनूस अटक करण्यात आली होती. तर 27 डिसेंबरला त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर औरंगाबाद येथे तपासासाठी घेऊन जाताना पोलिसांच्या जिपचा अपघात झाला आणि त्यावेळी तो पळून गेल्याचा पोलिसांनी दावा केला होता. जानेवारीमध्ये ख्वाजा युनूसचे कुटुंबिय न्यायालयात गेले होते. 7 जानेवारी 2003 ला ख्वाजाचा मृत्यू लॉकअप मध्ये मारहाणीत झाल्याचे न्यायालयात सिद्ध झालं. मुंबई उच्च न्यायालयाने एकूण 14 जणांच्या चौकशीचे आदेश स्टेट सीआयडीला दिले. मात्र राज्य शासनाने केवळ सचिन वझे आणि इतर 3 पोलीस कर्मचाऱ्यांच्या चौकशीला मान्यता दिली. शासनाने केवळ 4 जणांवरच खटला चालवला. सध्या हा खटला मुंबई येथील सेशन कोर्टात सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
औरंगाबादमधील बहीण भावाचं हत्याकांड, चुलतभाऊच निघाला मारेकरी
प्रेमाचा त्रिकोण; पतीचा खून तर पत्नी आणि प्रियकराची आत्महत्या
लॉकडाऊन काळात नोकऱ्या गमावणाऱ्या दोन तरुणी नागपुरात देहविक्री व्यवसायात