ठाणे पालिका सहाय्यक आयुक्त महेश अहिर यांच्या अडचणीत वाढ; CID-गुन्हे शाखेचा ससेमिरा
Maharashtra Thane News: ठाणे महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश अहिर यांच्या अडचणीत सध्या वाढ झालेली आहे. त्यांच्यामागे अनेक प्रकरणांच्या चौकशीचा ससेमिरा सुरु झाला आहे.
Maharashtra Thane News: ठाणे महानगर पालिकेचे (Thane Municipal Corporation) सहाय्यक आयुक्त (Thane Municipal Commissioner) महेश अहिर (Mahesh Ahir) यांच्या अडचणीत सध्या वाढ झालेली आहे. त्यांच्यामागे अनेक प्रकरणांच्या चौकशीचा ससेमिरा सुरु झाला आहे. सदनिका भ्रष्टाचार, दहावी-बारावी प्रमाणपत्र, ट्विटरवरील पैशांचा व्हिडीओ याबाबतची चौकशी ठाणे गुन्हे शाखेचे (Thane Crime Branch) पोलीस उपायुक्त शिवराज पाटील आणि त्यांचे पथक करत आहेत. तर वादग्रस्त ऑडिओ क्लिप, डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कुटुंबीयांना धमकी, आदींची चौकशी ही सीआयडी यांच्यामार्फत करण्यात येत आहे. महेश अहिर यांच्यामागे सध्या गुन्हे शाखा आणि सीआयडीच्या ससेमिरा लागलेला आहे. त्यामुळे अहिर यांच्या चौकशीत वाढ झालेली असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलावून दीड तास चौकशी
महेश अहिर यांच्यामागे सीआयडी आणि गुन्हे शाखेच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागलेला आहे. याचाच एक भाग म्हणून सहाय्यक आयुक्त महेश अहिर यांना गुरुवारी (16 मार्च) गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलावून दीड तास चौकशी करण्यात आली. मात्र अहिर हे चौकशीला सहकार्य करत नसल्याचे पोलीस सूत्रांची माहिती आहे. तर गुन्हे शाखा आता त्यांची शैक्षणिक प्रमाणपत्र दहावी आणि बारावी यांची मूळ कागदपत्र तपासणार आहेत. तर दुसरीकडे डायघर आणि मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या सदनिका विक्री वादग्रस्त प्रकरणात ठाणे गुन्हे शाखा कागदपत्र जमा करत आहे.
ऋता आव्हाड यांच्या तक्रारीनंतर सीआयडीमार्फत चौकशी
राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याचा प्लॅन असल्याचा दावा करणाऱ्या आणि त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने आणि विधानसभेत हा प्रश्न चर्चेला आल्याने ऋता आव्हाड यांच्या तक्रारीनुसार या गंभीर बाबीची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे महेश अहिर यांच्या समस्यांमध्ये वाढ झालेली आहे.
अहिर यांच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
ठाण्याचे सहाय्यक आयुक्त महेश अहिर यांच्या नावे काही कथित ऑडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यामध्ये कथित ऑडिओमधील व्यक्ती मी स्वतःवर फायरिंग करुन घेईन मग मी जितेंद्र आव्हाड यांचं नाव घेईन. माझ्यामागे खुद्द मुख्यमंत्री उभे आहेत माझ्या केसालाही धक्का लागणार नाही अशा पद्धतीचे वक्तव्य करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. तसेच एका ऑडिओ मध्ये सीएमच्या मार्गदर्शनात काम करत असल्याचा उल्लेख देखील ऑडिओमध्ये असल्याचा समोर आलं आहे. या सर्व ऑडिओ क्लिप सहाय्यक आयुक्त महेश आहिर यांना मारहाण करणारे जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत पवार यांनी ट्वीट केले आहेत. तसेच लवकरात लवकर महेश अहिर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. दरम्यन संबंधित ऑडिओची एबीपी माझा पुष्टी करत नाही