(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Thane Crime : ठाण्यात 'बदलापूर रिटर्न्स'; शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जामीन मिळताच संतप्त कुटुंबीयांचा ठिय्या
Thane Crime : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी अटकेत, पण दुसऱ्याच दिवशी जामीन, पीडित चिमुकलीच्या माता-पित्यांसह ठाण्यातील संतप्त जमाव रस्त्यावर...
Thane Crime : ठाण्यात (Thane) 'बदलापूर रिटर्न्स' घडल्याचं मंगळवारी दिसून आलं. एका अल्पवयीन चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला जामीन दिल्यामुळे जमाव संतप्त झाला होता. पीडित चिमुकलीच्या माता-पित्यांसह ठाण्यातील शेकडो महिलांनी मंगळवारी ठिय्या मांडत आक्रोश केला. चिमुकलीसोबत गैरवर्तन करणारा आरोपी शिंदे गटाचा (Shinde Group) उपविभागप्रमुख असून सचिन यादव असं त्याचं सचिन यादव त्याचं नाव असल्याची माहिती मिळत आहे.
ठाण्यातील भंडार आळी भागात एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य करण्यात आलं. याप्रकरणात आरोपी शिंदे गटाच्या उपविभागप्रमुखाने सचिन यादव (55) याच्यावर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र विनयभंगाच्या आरोपीला जामीन मिळालाच कसा? असा सवाल लाडक्या बहिणींनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. आरोपीला जामीन मंजूर झाल्यानंतर ठाण्यात पीडितेच्या आई-वडिलांसह शेकडो महिलांनी ठिय्या आंदोलन केलं. तसेच, शिंदे गटाच्या उपविभागप्रमुखाला तत्काळ अटक करा, अशी मागणी मनसेचे पदाधिकारी आणि चिमुकलीच्या घरच्यांनी केली आहे.
ठाण्याच्या स्टेशन परिसरातील भंडार आळीत राहणारी चिमुकली शुक्रवारी दुपारी ट्युशनला जात होती. तेव्हा शिंदे गटाचा उपविभागप्रमुख सचिन यादव (55) यानं त्या मुलीला इमारतीमध्ये गाठत विनयभंग केला. त्यावेळी घाबरलेल्या पीडित तरुणीनं त्या नराधमाला लांब ढककलं. त्यानंतर संतापलेल्या सचिन यादवनं अश्लील भाषेत भाष्य केलं. पीडित तरुणीनं आपल्यासोबत झालेला प्रकार तात्काळ कुटुंबियांना सांगितला. या घटनेची गंभीर दाखल घेत पीडितेच्या कुटुंबियांनी थेट ठाणे नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक देखील केली.
विशेष म्हणजे, विनयभंग करणाऱ्या आरोपीला दुसऱ्याच दिवशी जामीन मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नराधमाला एकाच दिवसांत जामीन मंजूर होतोच कसा? असं मनसे नेते अविनाश जाधव आणि पीडित मुलीच्या आई-वडिलांनी आज पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला पुन्हा अटक करण्याची मागणी केली. नराधम आरोपी शिंदे गटाचा उपविभागप्रमुख असून तो मोकाट फिरत असल्यानं पीडित कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे.
एकीकडे बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर आणि या आरोपीला पोलिसांकडून वेगळा न्याय का? असा संतप्त सवाल महिलांनी विचारला आहे. दरम्यान, पीडित चिमुरड्याच्या कुटुंबियांना धमक्यांचं सत्र सुरू झालं आहे. तक्रार मागे घ्या अन्यथा तुमचं वाईट करू, अशा धमक्या पीडितेच्या कुटुंबियांना आल्यात. त्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांनी पीडितेच्या कुटुंबियांसोबत आंदोलन करत ठिय्या दिला. जर दोन दिवसांत त्या नराधमाला अटक केली नाही तर, भंडार आळीपासून ते मासुंदा तलाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आम्ही कॅन्डल मार्च काढू, असं यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलं आहे.
पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांसमोर ठेवल्यात चार मागण्या...
- नराधम सचिन यादवला तत्काळ अटक करावी
- थाथुरमाथूर कलमं लावली असल्यामुळे कलमांत वाढ करावी
- हे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवावं
- जो कोणी धमक्या देत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत