शारीरिक भूक भागवण्यासाठी आले वेश्या वस्तीत, सापळा रचून चार अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांची झडप, पिस्तुलसह कार जप्त
Bhiwandi Crime : वासना शमवण्याच्या उद्देशाने हे चारही गुन्हेगार वेश्या वस्तीत येणार असल्याची माहिती पोलिसांना लागली आणि त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली.
ठाणे : जिल्ह्यातील सर्वात मोठी वेश्या वस्ती अशी ओळख असलेल्या भिवंडीतील हनुमान टेकडी भागात चार अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात आलं आहे. शारीरिक भूक भागवण्यासाठी हे चारही गुन्हेगार या वेश्या वस्तीत आले होते, त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून पिस्तुल, गावठी कट्ट्यासह कार जप्त केली. आशिष विनोद बर्नवाल( वय, 20), मोह. जुनैद मोह. नदीम कस्सार (वय, 18), अहमद अली हसन शा(वय 20), अतिरुपती अजयकुमार पाणिग्रही (वय 22) अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगार चौकडीचे नावे आहेत.
या वस्तीत सेक्स वर्कर म्हणून कार्यरत असलेल्या महिलांना सतत गुंडांकडून नाहक त्रास दिला जात असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. त्यानंतर आता हे प्रकरण समोर आलं आहे.
वेश्यावस्तीत पोलिसांनी रचला सापळा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अटक चारही गुन्हेगार नवी मुंबई परिसरातील दिघा गावात राहत असून रविवारी 14 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चारही गुन्हेगार वासनेच्या उद्देशाने हत्यारांसह भिवंडीतील खदानरोड येथील हनुमान टेकडी भागातील वेश्यावस्तीत एका कारमधून येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने भिवंडी शहर पोलिसांनी वेश्यावस्तीत सापळा रचून या चारही गुन्हेगारांना झडप घालून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा, एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस पोलीस पथकाला मिळून आले.
18 मे पर्यंत पोलीस कोठडी
पोलीस शिपाई महेंद्र उबाळे यांच्या तक्रारीवरून भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हेगारांकडून कारसह हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत. चारही गुन्हेगारांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर हे गुन्हेगार कुठल्या उद्देशाने हत्यारांसह आले होते. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भामरे करीत आहेत.
यापूर्वीही 23 फेब्रुवारी 2022 रोजी याच वेश्या वस्तीत घुसून एका सेक्स वर्कर महिलेकडे हफ्ता मागणाऱ्या सराईत गुंडांचे मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण करणाऱ्या एका 40 वर्षीय सेक्स वर्कर महिलेच्या पोटात धारदार चाकू भोसकून तिला गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली होती. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून सराईत गुंडाना अटक केली होती. मुजाहीद रहनुउद्दीन शेख (वय, 29 रा. मक्का मजीद शेजारी भिवंडी ) अरबाज जावेद शेख (वय 24, रा. रावजीनगर, भिवंडी) असे अटक केलेल्या सराईत गुंडांचे नाव आहेत, तर तिसरा आरोपी अल्पवयीन होता.
ही बातमी वाचा: