Mumbai Crime News: जुनं प्रेम मिळवण्यासाठी अडसर ठरणाऱ्या तरुणाला संपवलं, पोलिसांनी 12 तासांत मुसक्या आवळल्या
Mumbai Crime News: जुनं प्रेम मिळवण्यासाठीच्या वाटेत अडसर ठरणाऱ्या पूर्व प्रेयसीच्या मित्राला संपवणाऱ्याला पोलिसांनी अवघ्या 12 तासात अटक केली.
Crime News: बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राममंदिर ते जोगेश्वरी रेल्वे स्टेशन दरम्यान संदेश महादेव पाटील या 26 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरु करुन अवघ्या 12 तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या. छुटकन रामपाल साफी (23 वर्षे) अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रेम संबंधातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 मे रोजी दुपारी दोन अडीच वाजण्याच्या दरम्यान राममंदिर ते जोगेश्वरी रेल्वे स्टेशन दरम्यान एक तरुण जखमी अवस्थेत आढळून आला. एक मृतदेह बोरीवली रेल्वे पोलिसांनी हमालांच्या मदतीने मृतदेह कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटल रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्याचा रुग्णालयात आणण्यापूर्वी मृत्यू झाला असल्याचे सांगितले. बोरिवली रेल्वे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम, पोलीस निरीक्षक नितीन लोंढे, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत हंचाटे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना घटनास्थळाजवळ एक रक्ताने माखलेला दगड मिळून आला. या दगडानेच मयताचे चेहऱ्यावर मारहाण करून खून केला असल्याची पोलीसांची खात्री झाली. त्यानंतपर पोलिसांनी तो दगड पुरावा म्हणून ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला.
मयत तरुण आणि त्याच्यासोबत काम करणारी तरुणी यांच्यात प्रेम संबंध असल्याचे चौकशीत समोर आले. पोलिसांनी या तरुणीकडे चौकशी केली असता तिने समाधानकारक उत्तर दिले नाही. यामुळे पोलिसांनी तिचा मोबाईल ताब्यात घेऊन चौकशी केली असता छुटकन साफी याच्यासोबत तिचे अनेकदा फोनवर बोलणे झाल्याचे निष्पन्न झाले. यावरून पोलिसांनी मयत संदेश पाटील ज्या मार्गाने कामावरून बाहेर पडला त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. त्यावेळी छुटकन साफी हा घटनेच्या सायंकाळी मयत तरुणासोबत फिरत असताना दिसून आला.
पोलिसांनी छुटकन यास ताब्यात घेवून त्याची चौकशी सुरू केली. चौकशीत त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देवून गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला सीसीटिव्ही फुटेज दाखवले. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच छुटकनने संदेशची हत्या केली असल्याची पोलिसांसमोर कबुल केले.
मृत झालेल्या तरुणाचे तो काम करत असलेल्या बँकेतील तरुणी सोबत प्रेम संबंध होते. याच तरुणीचे पूर्वी छुटकन रामपाल साफी या तरुणांसोबत प्रेम संबंध होते. मात्र प्रेमात वितुष्ट आल्यामुळे छुटकन साफी आपले प्रेम पुन्हा मिळावे यासाठी प्रयत्न करत होता. मात्र, यास संदेश पाटील अडथळा ठरत असल्याने छुटकन साफी याने संदेश पाटील याची हत्या करून चेहरा ओळखता येऊ नये यासाठी चेहरा दगडाने ठेचला. त्यानंतर राम मंदिर स्थानक ते जोगेश्वरी दरम्यानच्या ट्रॅकवर मृतदेह फेकून दिला. सध्या बोरिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.