(Source: ECI/ABP News/ABP Majha)
परभणीत वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक; पोलीस रक्तबंबाळ, 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
परभणीत वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. जमावानं केलेल्या दगडफेकीत पोलीस रक्तबंबाळ झाले असून याप्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी : वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना परभणीत घडली आहे. जमावानं केलेल्या दगडफेकीत पोलीस रक्तबंबाळ झाल्याचं कळत आहे. वाद नेमका कोणत्या कारणामुळे झालाय यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. परभणीच्या पालम तालुक्यातील कापसी येथे हा धक्कादायक प्रकार घडला.
दोन गटांमध्ये काही कारणास्तव वाद झाला होता. हा वाद सोडविण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र संतप्त जमावानं वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक करून मारहाण केली. या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणीच्या पालम तालुक्यातील कापसी गावात 21 मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास दोन गटांमध्ये भांडण झाले होते. ते सोडविण्यासाठी कापसी येथील काही ग्रामस्थांनी पोलिसांना पाचारण केले. तेव्हा फौजदार विनोद साने आणि पोलीस नायक बलभीम पोले हे वाहन घेऊन कापसी गावात दाखल झाले. तेव्हा पोलीस विचारपूस करीत असताना देखील पोलिसांसमोरच एका गटाने दुसऱ्या गटातील ऐका इसमास मारहाण सुरु केली. ही मारहाण सोडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. परंतु 'तू इथे का आलास, आम्हाला का विचारतोस, असं म्हणत आरोपींनी लाठ्या-काठ्यांनी पोलीस नायक बलभीम पोले यांना मारहाण सुरु केली. त्यातील एका आरोपीने 'तुला खतमच करतो', अशी धमकी देत बलभीम पोले यांच्या डोक्यात दगड मारला. त्यामुळे पोले यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरु झाला. ते पाहून फौजदार विनोद साने यांनी जमावाची पांगवापांगव केली. त्यांनी जमावाच्या गराड्यातून कसेबसे पोले यांना गाडीत बसवून पालम ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
जमावाच्या दगडफेकीत जखमी झालेल्या पोले यांच्यावर पालम ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे पाठवून दिले. मारहाणीत पोले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून चार टाकेही पडले आहेत. त्यानंतर पोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 307, 353, 332, 341, 143, 147, 148, 149 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात कापसी गावात राहणाऱ्या आरोपी आत्माराम हरीभाऊ जाधव, बळीराम हरिभाऊ जाधव, वैभव गोविंद जाधव, गोविंद बळीराम जाधव, गोपाळ गोविंद जाधव, हरिभाऊ बळीराम जाधव, अर्जुन नामदेव घोगरे, सुमनबाई हरीभाऊ जाधव, लक्ष्मण कोंडीबा बांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार विनोद साने अधिक तपास करीत आहेत. तूर्तास आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :