Solapur Crime : सोलापुरात दरोडेखोरांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर चौघे जखमी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी-दर्गनहळ्ळी गावाच्या वेशीवर असलेल्या वस्तीवर दरोडेखोरांच्या हल्ल्यात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला तर चौघे जखमी झाले.
सोलापूर : सोलापुरात दरोडेखोरांचा उन्माद वाढत चालला आहे. सोलापूर शहरात काही दिवसांपूर्वीच दरोड्याची घटना ताजी असताना आज पुन्हा ग्रामीण भागात दरोडेखोरांनी दहशत माजवली. धक्कादायक बाब म्हणजे दरोडेखोरांच्या हल्ल्यात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला तर चौघे जखमी झाल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले असून घटनेची माहिती घेण्यात येत आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी-दर्गनहळ्ळी गावाच्या वेशीवर असलेल्या वस्तीवर रात्री एक ते तीनच्या सुमारास टोळीने दरोड्याचा प्रयत्न केला. गावातील बापू हिरजे या वृद्ध व्यक्तीच्या घरावर जवळपास सात जणांच्या टोळीने दरोडा टाकला. यावेळी बापू हिरजे यांच्या पत्नी सुलोचना गळ्यातील आणि कानातील जवळपास दीड तोळे सोन्याचे दागिने दरोडेखोरांनी हिसकावून घेतलं. यावेळी दरोड्याला विरोध करणाऱ्या बापू हिरजे यांच्यावर दगड आणि धारदार शस्त्राने वार देखील या दरोडेखोरांनी केला. धक्कादायक बाब म्हणजे सुलोचना हिरजे यांनी आवाज करु नये म्हणून दरोडेखोरांनी त्यांच्या तोंडाला कापड बांधून त्यांना डांबून ठेवले.
या हल्ल्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बापू हिरजे या 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. बापू हिरजे यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी दरोडेखोर शरणप्पा पाटील यांच्या घरावर दरोड्यासाठी गेले. यावेळी पाटील हे जागी झाले होते. त्यांनी लागलीच आपल्या मुलांना फोन करुन त्यांना देखील जागे केले. आसपासचे मंडळी एकत्रित झाल्याने त्यांना दरोडेखोर निघून गेल्याचा समज झाला. यावेळी बाहेर असलेल्या घरातील सदस्यांना घरात घेऊन दरवाजा बंद करत असताना दरोडेखोरांनी शरणप्पा पाटील यांच्यावर देखील चाकून हल्ला केला. यामध्ये पाटील यांच्या हाताला गंभीर जखम झाली. तर इतर लोकांवर देखील दरोडेखोरांनी दगडफेक केली. मात्र नागरिकांची संख्या वाढल्याचे पाहून दरोडेखोरांनी या ठिकाणाहून पोबारा केला. त्यामुळे पाटील यांच्या घरावरील त्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला.
पाटील यांच्या घरावरील दरोड्याचा प्रयत्न फसल्याने त्यांनी बापू हिरजे यांच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न केला. झोपेत असलेल्या बापू हिरजे यांच्या पत्नी सुलोचना यांच्या गळ्यातील आणि कानातील दागिने त्यांनी यावेळी लुटले. दरोड्याला प्रतिकार करणाऱ्या बापू हिरजे यांच्यावर दगडाने आणि शस्त्रांनी वार केले. त्यामुळे बापू हिरजे हे गंभीर जखमी झाले. सध्या द्राक्ष हंगाम सुरु असल्याने मृत बापू हिरजे यांचा मुलगा सोमनाथ हिरजे हा मळ्यात झोपायला गेला होता. पहाटे जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याने आईला झाडाला बांधलेल्या अवस्थेत पाहिलं. आईला सोडवून घरात गेल्यानंतर वडिलांचा जागीच मृत्यू झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर संपूर्ण गावात या घटनेची माहिती पसरली.
गावकऱ्यांनी पोलिसांना फोनद्वारे ही माहिती कळवली. घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. सोलापूर तालुका पोलिस ठाणे आणि वळसंग पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तसेच सोलापूर ग्रामीण पोलिसचे अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली. श्वान पथकाद्वारे दरोडेखोरांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न यावेळी पोलिसांनी केला. दरम्यान बापू हिरजे यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला असून शविच्छेदनाची प्रक्रिया सध्या सुरु आहे. तसेच यासंदर्भात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप सुरु आहे.