Solapur Crime News : दोन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोचा चार्जरच्या वायरनं गळा घोटला, नंतर स्वतःच्या गळ्याला दोरी लावली
Solapur Crime News : चार्जरच्या वायरने बायकोची हत्या करत नवऱ्याने देखील गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात घडली आहे.

Solapur Crime News : सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चार्जरच्या वायरने बायकोची हत्या करत नवऱ्याने देखील गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात घडली. गोपाळ लक्ष्मण गुंड (30) आणि गायत्री गोपाळ गुंड (22) अशी पती पत्नीची नावे आहेत. विशेष म्हणजे दोनच महिन्यांपूर्वी गोपाळ आणि गायत्री यांचा प्रेम विवाह झाला होता. या घटनेमुळे सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Solapur Crime News)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावातील गोपाळ लक्ष्मण गुंड (30) आणि गायत्री गोपाळ गुंड (22) यांचा दोन महिन्यांपूर्वीच प्रेम विवाह झाला होता. आषाढी एकादशी निमित्ताने त्यांचे कुटुंबीय हे कीर्तनासाठी बाहेर गेले होते. रात्री उशिरा घरी परतल्यानंतर कुटुंबियांना गायत्री आणि गोपाळ हे दोघे ही मृतावस्थेत आढळून आले.
पती गोपाळने त्याची पत्नी गायत्री हिचा चार्जिंगच्या वायरने गळा आवळत खून केला. त्यानंतर स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. गोपाळने असं टोकाचे पाऊल नेमकं का उचललं? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून या घटनेचा तपास सुरु केला आहे. मात्र या घटनेमुळे सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पैशाच्या कारणावरून मुलाने केली वडिलांची हत्या
दरम्यान, बार्शी तालुक्यातील वाणेवाडी गावात पैशाच्या कारणावरून झालेल्या वादातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. रावण सोपान खुरंगुळे (70) असं मृत वडिलांचं नाव आहे. अनंतराव ऊर्फ अनिल रावण खुरंगुळे या मुलाने वडिलांना काठी व पोतराजाच्या चाबकाने मारहाण करून ठार केलं. मारहाणीवेळी वडिलांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. या घटनेमागे बैल विक्रीनंतर मिळालेल्या पैशांवरून झालेला वाद कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. वडिलांनी बैल विकले, मात्र त्यातून मिळालेले पैसे न दिल्याचा राग मनात धरून मुलाने हा क्रूर प्रकार केला. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अनिल खुरंगुळे याला बार्शी ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























