(Source: Poll of Polls)
Dhule News : मोबाईल हॅक करून फोटो सोशल मिडीयावर व्हायरल; भीतीपोटी फार्मसीच्या विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल, धुळ्यातील धक्कादायक घटना
Dhule News : मोबाईल हॅक होऊन काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या भीतीने एका वीस वर्षीय बी फार्मसीच्या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.

Dhule News : धुळे जिल्ह्याच्या शिरपूर (Shirpur) तालुक्यातील ताजपुरी येथे एका 20 वर्षीय बी फार्मसीच्या विद्यार्थ्याने आपला मोबाईल हॅक (Mobile hack) झाला आणि काही फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंटी उर्फ किशन जितेंद्र सनेर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Dhule News)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील थाळनेरजवळ असलेल्या ताजपूरी गावातील सनेर कुटुंबातील एकुलता एक मुलगा असलेल्या किशनने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
मोबाईल हॅक करून फोटो सोशल मिडीयावर व्हायरल
प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने मृत किशनचा मोबाईल हॅक करून काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. ही बाब किशनच्या लक्षात आल्यानंतर तो नैराश्यात गेला आणि त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, असे बोलले जात आहे. या घटनेची थाळनेर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधिकारी शत्रुघ्न पाटील यांनी सांगितले की, तरुणाचा मोबाईल हॅक झाल्याची माहिती समोर आली असून, त्या दिशेने चौकशी सुरू आहे. यासाठी किशनचे काही निकटवर्तीय आणि मित्रांकडे विचारपूस करण्यात येणार असून, त्याचा मोबाईल देखील तपासला जाऊ शकतो. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले
दरम्यान, धुळे तालुक्यातील मोर्दड गावातील जगदीश ठाकरे हा 29 जून रोजी घरी जेवण करत असताना, त्याचे दोन मित्र त्याला वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी बोलवायला आले. त्यामुळे जेवण न करताच जगदीश मित्रांसोबत निघून गेला. परंतु त्यानंतर तो घरी परतला नाही, म्हणून कुटुंबीयांनी त्याचा शोध घेत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. दरम्यान, 2 जुलै रोजी कन्नड घाट परिसरात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही माहिती पोलिसांनी जगदीशच्या कुटुंबीयांना दिली. मृतदेहाच्या अंगावर असलेल्या टॅटूमुळे त्याची ओळख पटली आणि मृत व्यक्ती जगदीश ठाकरे असल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक तपासणीत त्याचा गोळ्या झाडून खून केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, या गुन्ह्याचा मास्टरमाइंड नेमका कोण? याचा तपास सध्या सुरू आहे.
आणखी वाचा



















