(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Solapur CCH Scam : सोलापुरात गाजलेल्या सीसीएच घोटाळा प्रकरणातील आरोपींना तब्बल तीन महिन्यानंतर बेड्या
Solapur CCH Scam : सोलापुरात सीसीएच अॅपच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास सांगून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींना तीन महिन्यांनी अटक करण्यात आली आहे. अनंत येरनकोल्लू आणि जयंत येरनकोल्लू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
Solapur CCH Scam : सोलापुरात (Solapur) सीसीएच अॅपच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास सांगून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अनंत येरनकोल्लू आणि जयंत येरनकोल्लू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून तब्बल तीन महिन्यानंतर या आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. अनंत येरनकोल्लू, जयंत येरनकोल्लू, स्मिता येरंकल्लू यांच्यावर 12 ऑक्टोबर 2022 रोजी सोलापुरातल्या अनेक नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून पोलीस तिन्ही आरोपींच्या शोधात होते. मात्र काल अनंत आणि जयंत येरंकल्लू यांना अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
या आरोपीनी शेकडो लोकांना अल्प मुदतीत जादा पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. यामुळे अनेकांनी अॅपच्या माध्यमातून कोट्यवधीची गुंतवणूक केली. त्यानंतर, अचानकच हे अॅप बंद झाल्याने गुंतवणूकदारांनी पैशांच्या मागणीसाठी तगादा लावला. त्यानंतर येरनकोल्लू बंधू अचानक गायब झाले. याबाबत फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आरोपीनी अॅड. मंजुनाथ कक्कलमेली यांच्यामार्फत जामिनासाठी उच्च न्यायालयापर्यंत दाद देखील मागितली. मात्र त्यांनी न्यायालयातून माघार घेतली. त्यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी येरनकोल्लू बंधूना अटक केली आहे.
या दोन्ही आरोपींवर अटकेची कारवाई केल्यानंतर रात्री वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. माझ्या दोघांना सोलापूर न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल. आरोपी ताब्यात आल्याने तपासाच्या गतीला वेग येईल अशी प्रतिक्रिया आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिली.
सोलापुरातल्या फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये 12 ऑक्टोबर 2022 रोजी गुन्हा दाखल होताना 31 लोकांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. फसवणुकीचा आकडा हा 41 लाख इतका होता. मात्र त्यानंतर आणखी काही लोक पुढे आले. आतापर्यंत या गुन्ह्यात तक्रार देण्यासाठी 74 लोक पुढे आले असून फसवणुकीचा आकडा हा 78 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र हा आकडा याहून जास्त असण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे प्रतिक्रिया या प्रकरणातील मुख्य तक्रारदार राम जाधव यांनी दिली.
हे नेमकं प्रकरण काय आहे?
क्लाऊड मायनर ॲप अर्थात CCH ही एक अमेरिकन कंपनी असून अवघ्या काही दिवसात दाम दुप्पट करुन देत असल्याची माहिती सोलापूरकरांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. अवघ्या काही दिवसात हजारो सोलापूरकरांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक या अॅपमध्ये केली. सुरुवातीला पाच हजारपासून या वेबसाईटवर गुंतवणूक सुरु झाली. अनेकांना मोठा परतावा मिळाला. त्यातूनच लोकांनी गुंतवणुकीची रक्कम वाढवायला सुरुवात केली. हजारो सोलापूरकरांनी कोट्यवधीची गुंतवणूक या अॅपमध्ये केली. काहीही काम न करता केवळ मोबाईल फोनद्वारे अत्यंत कमी दिवसात दुप्पट किंवा तीनपट पैसे मिळतील या आशेवर अनेकांनी मोठी गुंतवणूक केली. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून Withdraw बंद आहे त्यामुळे पैसे बुडाल्याची शक्यता गुंतवणूकदार व्यक्त करत आहेत.
गुंतवणूकदारांना काय आमिष दिले जायचे?
सीसीएच स्कीम डेली रिटर्नवर जास्त चालते. अॅपवर अनेक योजना आहेत. सभासद होताना सुरुवातीला 1090 यूएसडीटी डॉलरची गुंतवणूक केली जाते. 1090 डॉलर म्हणजे 92 हजार 650 रुपयांची वर्च्युअल गुंतवणूक केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून रोज सभासदांना 7 हजार 412 रुपये असे 35 दिवस मिळतात. म्हणजे 35 दिवसांत दोन लाख 59 हजार 419 रुपये अॅपच्या खात्यावर डॉलर स्वरुपात जमा होतात. दुसऱ्या योजनेंतर्गत 1624 यूएसडीटी डॉलर म्हणजे 1 लाख 38 हजार 40 रुपये गुंतविल्यानंतर 102 दिवसांत 26 लाख 48 हजार 820 रुपये मिळतात. म्हणजे प्रतिदिन 15 हजार 322 रुपये मिळतात. अशा अनेक योजना अॅपवर होत्या.
संबंधित बातमी
Solapur CCH Scam : अॅपद्वारे पैसा दुप्पट करण्याचं आमिष, सोलापूरकरांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक