Solapur CCH Scam : अॅपद्वारे पैसा दुप्पट करण्याचं आमिष, सोलापूरकरांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
Solapur CCH Scam : क्लाऊड मायनर अॅप या विदेशी ॲपमध्ये पैसे गुंतवल्यानंतर चक्क दाम दुप्पट होत असल्याची वार्ता नागरिकांमध्ये पसरली. यानंतर सोलापुरातील शेकडो लोकांनी पैसा गुंतवला. हे पैसे बुडाल्याची चर्चा सुरु आहे.
Solapur CCH Scam : सोलापुरात (Solapur) ऑनलाईन अॅपद्वारे गुंतवणूक केलेले कोट्यवधी रुपये बुडाल्याची चर्चा सुरु आहे. CCH म्हणजेच क्लाऊड मायनर अॅप या विदेशी ॲपमध्ये पैसे गुंतवल्यानंतर चक्क दाम दुप्पट होत असल्याची वार्ता नागरिकांमध्ये पसरली. यानंतर सोलापुरातील शेकडो लोकांनी पैसा गुंतवला. फसवणुकीचा हा आकडा कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फसवणूक (Fraud) झालेल्या गुंतवणूकदारांकडून सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे.
हे नेमकं प्रकरण काय आहे?
क्लाऊड मायनर ॲप अर्थात CCH ही एक अमेरिकन कंपनी असून अवघ्या काही दिवसात दाम दुप्पट करुन देत असल्याची माहिती सोलापूरकरांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. अवघ्या काही दिवसात हजारो सोलापूरकरांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक या अॅपमध्ये केली. सुरुवातीला पाच हजारपासून या वेबसाईटवर गुंतवणूक सुरु झाली. अनेकांना मोठा परतावा मिळाला. त्यातूनच लोकांनी गुंतवणुकीची रक्कम वाढवायला सुरुवात केली. हजारो सोलापूरकरांनी कोट्यवधीची गुंतवणूक या अॅपमध्ये केली.
काहीही काम न करता केवळ मोबाईल फोनद्वारे अत्यंत कमी दिवसात दुप्पट किंवा तीनपट पैसे मिळतील या आशेवर अनेकांनी मोठी गुंतवणूक केली. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून Withdraw बंद आहे त्यामुळे पैसे बुडाल्याची शक्यता गुंतवणूकदार व्यक्त करत आहेत.
गुंतवणूकदारांना काय आमिष दिले जायचे?
- सीसीएच स्किम डेली रिटर्नवर जास्त चालते.
- अॅपवर अनेक योजना आहेत.
- सभासद होताना सुरुवातीला 1090 यूएसडीटी डॉलरची गुंतवणूक केली जाते.
- 1090 डॉलर म्हणजे 92 हजार 650 रुपयांची वरच्यूअल गुंतवणूक केली जाते.
- त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून रोज सभासदांना 7 हजार 412 रुपये असे 35 दिवस मिळतात.
- म्हणजे 35 दिवसांत दोन लाख 59 हजार 419 रुपये ऍपच्या खात्यावर डॉलर स्वरुपात जमा होतात.
- दुसऱ्या योजनेंतर्गत 1624 यूएसडीटी डॉलर म्हणजे 1 लाख 38 हजार 40 रुपये गुंतवल्यानंतर 102 दिवसांत 26 लाख 48 हजार 820 रुपये मिळतात.
- म्हणजे प्रतिदिन 15 हजार 322 रुपये मिळतात. अशा अनेक योजना अॅपवर होत्या.
योजनेनुसार सुरुवातीला अनेक दिवस पैसे जमा होत राहिले. एकाएकी पैसे गुंतवणाऱ्यांचे प्रमाण शंभरपटीने वाढले. त्यानंतर अचानकपणे विथड्रॉवल बंद झाला. त्यामुळे नव्याने योजनेत सहभागी झालेल्यांचे पैसे बुडाला. डायरेक्ट सेलिंगबद्दल लोकांना ज्ञान नाही. तांत्रिक माहिती नसताना व्हर्चुअल गुंतवणूक केल्याने लोकांना फटका बसत आहे, अशी माहिती नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहेत.
सोलापुरात झालेल्या या फसवणुकीचा आकडा किती मोठा आहे हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र हा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते आहे. बदनामीच्या भीतीने अनेक जण समोर येऊन तक्रार द्यायला घाबरत आहेत. त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्याचं फावतं आहे.
नेटफ्लिक्सवर जामतारा नावाची एक सीरिज आहे. ज्यामध्ये लोकांना फोन करुन बँकेचे तपशील घेतले जायचे आणि फसवणूक केली जायची. मात्र आता फसवणुकीचे प्रकार बदलत चालले आहेत. CCH चा प्रकार तसाच दिसत आहे. केवळ CCH नव्हे तर असे शेकडो अॅप दाम दुप्पट किंवा तिप्पट करण्याचे आमिष दाखवून सुरु आहेत. त्यामुळे आर्थिक गुंतवणुकीबद्दल लोकांना साक्षर करण्याची मोठी गरज असल्याचे दिसत आहे.
CCH Scam : पैसा दुप्पट करण्याचं आमिष, फसवणुकीनंतर अनेकांची पोलीस ठाण्यात धाव