अमरावतीत मेडिकल व्यवसायिकाच्या हत्येने खळबळ; पोलिसांकडून चार संशयित ताब्यात
Crime News: अमरावती तहसील कार्यालय परिसरात असलेल्या मेडिकल व्यवसायिकाची हत्या झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Crime News: अमरावती तहसील कार्यालय परिसरात असलेल्या मेडिकल व्यवसायिकाची हत्या झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. उमेश कोल्हे (54) असं हत्या झालेल्या इसमाचे नाव असून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोल्हे यांच्या हत्ये प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. अटकेतील आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून मागील काही दिवसांपासून आपण कोल्हे यांची रेकी करीत असल्याची माहिती आहे. अद्याप या हत्येचे खरे कारण स्पष्ट झाले नसून पोलीस सखोल तपास करीत आहेत. उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले आरोपी हे विशिष्ट समाजाचे असल्याने चर्चाला उधाण आले आहे. निर्मल स्वभावाचे उमेश कोल्हे यांची हत्या का करण्यात आली हे अद्यापही अस्पष्ट असल्याने हत्या का झाली हे समोर यावं अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे.
अमरावती तहसील कार्यालयाजवळ असलेल्या मॉल मध्ये मृतक उमेश कोल्हे यांचे अमित व्हेटर्नरी मेडिकल नावाने दुकान आहे. 22 जून रोजी हत्येचा रात्री उमेश कोल्हे हे मुलगा संकेत आणि सून वैष्णवी यांच्यासोबत वेगवेगळ्या दुचाकीने घरी जात होते, वाटेत न्यू हायस्कूल मेन शाळेजवळ असलेल्या अंधाराचा फायदा घेऊन दोघांनी उमेश कोल्हे यांची दुचाकी अडवली आणि झटापटीत कोल्हे यांच्या मानेवर चाकूने वार केले. या हल्ल्यात कोल्हे यांच्या मानेची मुख्य नस कापल्या गेल्याने गंभीर जखमी झाली आणि त्यातच कोल्हे यांचा मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात येताच कोल्हे यांचा मुलगा आणि सून त्यांच्या मदतीसाठी धावले, मात्र अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर पसार झाले. दोन हल्लेखोरांनी गाडी अडवून हल्ला केला आणि पसार झाले अशी माहिती उमेश कोल्हे यांच्या मुलाने पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि शहर कोतवाली पोलिसांनी तपास सुरू केला आणि 24 तासांच्या आता दोन संशयितांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. मुदस्सीर अहमद शेख इब्राहिम आणि शाहरुख पठाण इहायत खान अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
अटक असलेल्या आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी इतर दोघांची नावे पोलिसांना सांगितली. त्या आधारे पोलिसांनी अन्य दोघांना देखील ताब्यात घेतले आहे. दोन आरोपींना न्यायालयाने 28 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तसलिम (24) बिसमिल्लानगर आणि शोएब खान उर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (22) यास्मीननगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मुदस्सीर अहेमद शेख इब्राहिम (22) बिसमिल्लानगर आणि शाहरूख पठाण हिदायत खान (24) सुफियाननगर अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची एकूण संख्या आता चार झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मेडिकल व्यावसायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अमरावती गुन्हे शाखा आणि शहर कोतवाली पोलीस या हत्येचा सखोल तपास करीत असून कोल्हे यांची हत्या कोणत्या उद्देशाने झाली की याचा शोध पोलीस घेत आहेत.