Sangli : मुलाचे प्रेमप्रकरण, मुलीच्या नातेवाईकांकडून मुलाच्या वडिलांना विजेच्या खांबाला बांधून मरेपर्यंत मारहाण, सांगलीतील धक्कादायक घटना
Sangli Crime : सांगलीतील शिराळा तालुक्यात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत बारा जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
सांगली: जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील मांगलेमध्ये प्रेम संबंधातून मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी विजेच्या खांबाला दोरीने बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. त्यामध्ये मुलाचे वडील दादासाहेब रामचंद्र चौगुले यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे तर चौघांना अटक केली आहे.
दादासाहेब चौगुले यांच्या मुलाचे त्यांच्याच गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून चौगुले यांच्या मुलाने संबंधित मुलीला पळवून नेले होते. याचा राग मुलीच्या नातेवाईकांना होता. दरम्यान दादासाहेब चौगुले हे बुधवारी सकाळी त्यांच्या शेताकडे गेले असता मुलीचे नातेवाईक देखील त्या ठिकाणी आले. आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेला आहे, ते कोठे आहेत सांगा असे म्हणून दादासाहेब चौगुले यांना विजेच्या खांबाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली.
या बेदम मारहाणीमुळे दादासाहेब चौगुले हे बेशुद्ध झाले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलं. याप्रकरणी शिराळा पोलिसांनी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. या घटनेमुळे शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली.
प्रेमप्रकरणातून तरुणाला संपवलं
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बामणोली दत्तनगरमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली. ओम श्रीधर देसाई (वय 19 रा. दत्तनगर, बामणोली) असे त्या तरुणाचे नाव असून प्रेमप्रकरणातून तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. रविवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास दत्तनगर मधील खुल्या जागेत हा खून झाला. चौघा हल्लेखोरांनी हा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी
संशयित ओंकार निलेश जावीर (वय 20), रोहित बाळासाहेब केंगार (18), सोहम शहाजी पाटील (20), ज्ञानेश्वर पाटील (20, रा. चौघेही दत्तनगर,बामणोली) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी सोहम आणि ओंकारला अटक केली आहे. संशयित आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ओंकारने ओमल 'तू माझ्या बहिणीच्या मागे का लागला आहेस?' असा जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. त्यावेळी ओंकारसोबत असलेल्या सोहम, ज्ञानेश्वर व अन्य एकाने चाकू व कोयत्याने पोटात व डोक्यावर चौघांनी वार करून गंभीर जखमी केले व हल्लेखोर पसार झाले. त्यामुळे ओम रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ओमला त्याच्या भावाने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ओमला मयत घोषित केले.
ही बातमी वाचा :