(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वाळू चोरताना अंगावर ढिगारा कोसळून तरुणाचा मृत्यू, दोन वाळू तस्करांवर गुन्हा; एकाला बेड्या
Sangli News : सांगलीतील जत तालुक्यात वाळू चोरी करताना तरुणाचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाच्या अंगावर वाळूचा ढिगारा कोसळला अन् त्याचा जागीच मृत्यू झाला.
Sangli News : सांगलीतील जत तालुक्यात (Jat Taluka) वाळू चोरी करताना तरुणाचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाच्या अंगावर वाळूचा ढिगारा कोसळला अन् त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन वाळू तस्करांवर गुन्हा दाखल केलाय. धडक कारवाई करत एका वाळू तस्कराला ताब्यात घेतलेय. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहे.
जत तालुक्यातील खंडनाळ येथे वाळू चोरी करताना तरुणाच्या अंगावर वाळूचा ढिगारा कोसळून त्या तरुणाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सचिन सयाप्पा कुलाळ (वय 25, रा. कुलाळवाडी, खंडनाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. जत मधील बोर नदीपात्रात ही घटना घडली आहे. यामध्ये एक जण जखमी झाला. यामध्ये संशयित आरोपी सुरेश टेंगले, बिरुदेव टेंगल या दोघांविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपींनी वाळू चोरी करण्यासाठी सचिन यास जबरदस्तीने अवैध वाळू व्यवसाय व वाळू भरण्यासाठी नेले होते. वाळूच्या खोल खड्यामधून वाळू उपसा करताना बाजूचा ढिगारा कोसळेल याची माहिती असताना रात्रीच्या अंधारात वाळू उपशाचे काम लावले. त्यामुळे ढिगारा अंगावर पडल्याने त्याखाली सापडून सचिन मृत झाला आहे.
सचिन कुलाळ हा पत्नी, मुले, आई- वडीलांसमवेत राहत होता. शुक्रवारी रात्री गावातील ट्रॅक्टर मालक सुरेश टेंगले यांनी त्यास वाळू भरण्यासाठी नेले. रात्री चार-पाच मजूर मिळून वाळूचे ट्रॅक्टर बोर नदीपात्रात भरत होते. वाळू उपशाने खोल खड्डा पडला होता. रात्रीची वेळ असल्याने वाळू भरताना ढिगाऱ्याचा अंदाज आला नाही. वाळू उपसताना बाजूचा ढिगारा थेट अंगावरच कोसळला. सचिन पुढे असल्याने ढिगाऱ्याखाली सापडला. वाळूची ढेकळे असल्याने सचिनला डोक्याला, पाठीला जोराचा मार लागला. तो जागेवरच बेशुद्ध पडला. या दुर्घटनेत मजूर आकारम करे हा जखमी झाला. त्याला मुका मार लागला आहे. सचिनला तत्काळ जत येथील खासगी दवाखान्यात दाखल केले.शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती जत पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात 3 आणला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत सचिनच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. ट्रॅक्टर व चारचाकी गाडी जप्त केली आहे. अधिक तपास महिला पोलिस निरीक्षक आर.व्ही. गायकवाड करीत आहेत. याबाबत फिर्याद मृत सचिनचा भाऊ भैरवनाथ सयाप्पा कुल्लाळ यांनी दिली.