सांगली हादरलं! प्रॉपर्टीच्या वादातून नातवांनी आईच्या मदतीनं आजीला संपवलं, पोलिसांनी 3 जणांना ठोकल्या बेड्या
Sangli Crime News : प्रॉपर्टीच्या वादातून सांगलीमध्ये एका आजीचा नातवांनी खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Sangli Crime News : प्रॉपर्टीच्या वादातून सांगलीमध्ये एका आजीचा नातवांनी खून (Crime News) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक, म्हणजे या हत्येमध्ये आरोपींच्या आईचाही समावेश आहे. तिघांनी मिळून 80 वर्षीय आजीचा टॉवेलनं गळा आवळून खून केला. खानापूर (Sangli Khanapur) तालुक्यातील ही घटना घडली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी (sangli police) तात्काळ तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.
प्रॉपर्टीच्या वादातून नातवांनी स्वत:च्या आजीचा टॉवेलने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना खानापूर तालुक्यातील पारे येथे घडली. सखुबाई संभाजी निकम (वय 80) असे मृत झालेल्या आजीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसांनी आजीच्या एका अल्पवयीन नातवासह दुसरा नातू आणि सूनेलाही बेड्या ठोकल्या आहेत. आशिष सतीश निकम आणि रेणुका सतीश निकम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.
प्रॉपर्टीचा वाद -
चिंचणी येथील सतीशशेठ निकम यांचा सोने-चांदी गलाई व्यवसाय आहे. त्यांची विटा, चिंचणी (मं.) यासह विविध ठिकाणी प्रॉपर्टी आहे. यातील अर्धा हिस्सा सतीश यांचे जावई कुणाल पाटील यांच्या नावावर करण्यासाठी त्यांची पारे येथील बहीण संगिता रामचंद्र साळुंखे यांनी भाऊ सतीश यांना सांगितले होते. त्याचा राग संशयित नातू आशिष, त्याचा अल्पवयीन भाऊ व सून सौ. रेणुका यांना होता.
रागातून आजीला संपवलं -
राग मनात धरून संशयित तिघांनी 19 फेब्रुवारी रोजी संगिता साळुंखे यांच्या पारे गावातील घरी जाऊन त्यांना तू तूझ्या भावाला बोलावून घेऊन 48 तासाच्या आत सदरची प्रॉपर्टी फिरवून दे. नाहीतर तुला व म्हातारीला (सखुबाई) यांना 48 तासानंतर दाखवितो, अशी धमकी देऊन हे तिघेही विट्याला निघून गेले. त्यानंतर मंगळवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास हे तिघेही सतीश यांची बहीण संगिता यांच्या पारे येथील घरी गेले. त्यावेळी सखुबाई या मुलगी संगिताच्या घरी होत्या. या तिघांनी पुन्हा त्याठिकाणी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर आजी सखुबाई यांना एका खोलीत नेऊन आतून दरवाजा बंद करून त्यांचा टॉवेलने गळा आवळून खून केला. त्यानंतर हे तिघेही संशयित त्यांच्या विटा येथील घरी आले. याबाबत संगिताकडून पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांची धडक कारवाई -
या घटनेची माहिती मिळताच उपअधिक्षक विपुल पाटील, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून सखुबाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विटा ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी विटा पोलीसांनी मयत सखुबाई यांचा अल्पवयीन नातवासह दुसरा नातू आशिष, सून रेणुका निकम या तिघांना रात्री उशिरा अटक केली. या घटनेची विटा पोलीसांत नोंद झाली असून पोलीस निरीक्षक शरद मेमाणे पुढील तपास करीत आहेत.