(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli : सांगलीच्या आयर्विन पुलावर टेम्पो-कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 11 जखमी
Sangli Accident News : सांगलीच्या आयर्विन पुलावर भजनी मंडळाचा टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन या अपघातात दोन जण जागीच ठार तर 11 जण जखमी झाले आहेत.
Sangli Accident News : सांगलीच्या आयर्विन पुलावर रात्री भीषण अपघात झाला आहे.. भजनी मंडळाचा टेम्पो आणि वॅगणार कारची समोरासमोर धडक होऊन या अपघातात दोन जण जागीच ठार तर 11 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका वृद्ध आजीचा समावेश आहे. तुंग येथील काही भजनी मंडळाच्या महिला टेम्पोमधून शिरोळकडे चालले होते. यावेळी आयर्विन पुलावर समोरून येणाऱ्या कार आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत तर टेम्पोमधील 10 व कारमधील 1 जण जखमी झाले आहेत.
अपघातानंतर जखमींना सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर सांगली शहर पोलीस आणी मनपा अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल होत मदत कार्य केले. टेम्पोमधील सर्व 12 जण शिरोळला भजनी कार्यक्रमास निघाले होते. त्यावेळी या टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात झाला.
सुभद्रा अर्जुन येळवीकर (वय 70), इर्शाद रफिक नदाफ (वय 33) अशी या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या अपघातातील मृत व जखमी मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज व तुंग परिसरातील आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातात जखमींमध्ये सुनिल नामदेव गुरव (वय 40), यशोदा खाबिले (वय 70), अशोक शांतिनाथ मालगावे (वय 42),फुलाबाई आप्पासाहेब खामकर (वय 40), हैदर पटेल (वय 35), सविता नवळे (वय 40), रुक्मिणी शिवाजी पवार (वय 70), जनाबाई बाजीराव पाटील (70), मंगल सोपान कापसे (55, सर्व रा. तुंग) यांचा समावेश आहे.
अपघाताचे वृत्त समजताच शहर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचा चक्काचूर झालेला होता. अपघात इतका भीषण होता की मृतदेह रस्त्यावर फेकले गेले होते. जखमी मदतीसाठी याचना करीत होते. पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली. नंतर सहा रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या. जखमींना व मृतांना शासकीय रुग्णालयामध्ये हलविण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या