Salman Khan : सलमान खान गोळीबार प्रकरण, अनुज थापन मृत्यू तपास तातडीने CBI कडे सोपवण्यास हायकोर्टाचा नकार
Salman Khan House Firing : मुंबई पोलिसांनी या प्रकरणी चौकशी अहवाल सादर करावा असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
मुंबई : सलमान खानच्या (Salman Khan) घरावरील गोळीबार प्रकरणी अनुज थापनच्या कोठडीतील मृत्यूचा (Anuj Thapan Death) तपास तातडीनं सीबीआयकडे सोपवण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. अनुज थापनला थर्ड डिग्री दिल्यानंच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याची आई रिटादेवीने हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. या प्रकरणी 22 मे रोजी हायकोर्टात पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे.
अनुज थापन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांना चौकशी अहवाल सादर करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. स्टेट सीआयडी याप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली स्वतंत्र चौकशी करत असल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे.
अनुज थापनची तुरुंगात आत्महत्या
सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेला एक आरोपी अनुज थापन याने कोठडीत गळफास लावून आत्महत्या केली होती. जेजे रुग्णालयाच्या शवविच्छेदनामध्येही त्याचा मृत्यू गळफास लावून झाल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला अनुजच्या कुटुंबीयांनी मुंबईत येऊनही अनुजचा मृतदेह घेण्यास नकार दिला होता. तसेच त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील केली. मात्र अनुजच्या आईची प्रकृती लक्षात घेऊन त्यांनी अनुजचा मृतदेह पंजाबला नेण्याची तयारी दर्शवली आणि पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला
न्यायालयाच्या आदेशानंतर दुसरे शवविच्छेदन
दरम्यान अनुजचे मामा कुलदीप यांनी एबीपी न्यूजशी संवाद साधून यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, आम्ही दुसरं पोस्टमार्टम करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. त्यानंतर त्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला आणि अनुजच्या मृतदेहाचे दुसरे पोस्टमॉर्टम झाले. थापनची आई रीटादेवी यांच्या याचिकेला सुरुवातीला पंजाब सरकारने विरोध केला. पण नंतर कुटुंबाच्या समाधानासाठी पंजाब सरकारने आपला विरोध मागे घेतला.
मुंबई पोलिसांनी केली होती अटक
सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेने 25 एप्रिल रोजी सोनू चंदर (37 वर्ष) आणि अनुज थापन (32 वर्ष) यांना अटक केली होती. सोनू चंदर हा शेती करतो आणि त्याचे किराणा दुकानही आहे. तर अनुज थापन ट्रक हेल्पर म्हणून काम करत होता. तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता, त्याच्यावर खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी आता अनुज थापनने तुरुंगात आत्महत्या केली आहे.
ही बातमी वाचा: