Pune Daund Crime : पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नीला जन्मठेप, सात वर्षांनी निकाल
Pune Daund Crime : 23 ऑगस्ट 2015 रोजी रात्रीच्या वेळी शोभा इंगळेने तिचा पती अनिल संतोष इंगळे यांच्या डोक्यात आधी दगड घातला आणि नंतर विळ्याने वार करुन त्याचा खून केला होता. या प्रकरणात तिला जन्मठेप ठोठावण्यात आली आहे.

Pune Daund Crime : पुणे (Pune) जिल्ह्याच्या दौंड (Daund) तालुक्यात 2015 मध्ये घडलेल्या एका खुनाच्या (Murder) प्रकरणात दोषी जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तब्बल सात वर्षांनी या प्रकरणी निकाल आला आहे. बारामतीमधील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी पत्नीला ही शिक्षा सुनावली. शोभा अनिल इंगळे असं जन्मठेपेची शिक्षा मिळालेल्या महिलेचं नाव आहे.
काय आहे प्रकरण?
दौंड तालुक्यातील खुटबाव येथील साळोबाची वस्ती इथे 23 ऑगस्ट 2015 रोजी हे हत्याकांड घडलं होतं. 23 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी शोभा इंगळे हिने तिचा पती अनिल संतोष इंगळे यांच्या डोक्यात आधी दगड घातला आणि नंतर विळ्याने वार करुन त्याचा खून केला होता. केवळ दोघांमध्ये पटत नसल्याच्या कारणावरुन हा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
जन्मठेप आणि दंड
खून झाल्याची घटना 23 ऑगस्ट 2015 रोजी घडली होती. मृत अनिल संतोष इंगळे यांचा भाऊ सुनील संतोष इंगळे यांनी शोभा अनिल इंगळे हिच्याविरोधात यवत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शोभा इंगळे हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस अधिकारी आर. के. गवळी यांनी या गुन्ह्याचा तपास करत आरोपी महिलेविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी बारामतीतील जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.ए. शेख यांच्यासमोर झाली. शोभा अनिल इंगळे हिच्यावर भादंवि कलम 302 अंतर्गत खुनाचा आरोप निश्चित करुन जन्मठेपेची आणि पाच हजार रुपये दंड तसंच दंड न भरल्यास पंधरा दिवसांची साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
दहा साक्षीदारांचा जबाब
या खटल्याची सुनावणी न्यायाधीश श्री. शेख यांच्यासमोर चालली. यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील अॅडवोकेट सुनील वसेकर यांनी कामकाज पाहिले. यामध्ये एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि साक्षीदारांचे जबाब आणि प्रत्यक्षदर्शी पुरावा ग्राह्य धरुन न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्यात आरोपी शोभा इंगळे हिला शिक्षा ठोठावली. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी मदने यांनी काम पाहिलं. पोलीस नाईक वेणूनाद ढोपरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एन ए नलवडे यांनी सहकार्य केलं.
हेही वाचा



















