Pune Crime Ganesh Komkar: ए गोविंदा... झोपलाय तो, पप्पा आलेत, उठायला सांग त्याला; गणेश कोमकर लेकाचा मृतदेह पाहताच धाय मोकलून रडला
Ayush Komkar case Pune: पुण्यातील नाना पेठ परिसरातील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये आंदेकर टोळीने आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडून त्याला संपवले होते. वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला

Ayush Komkar Murder case In Pune: पुण्यातील नाना पेठ परिसरात 5 सप्टेंबरला टोळीयुद्धातून आयुष कोमकर या 19 वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. वर्षभरापूर्वी पुण्यात वनराज आंदेकर (Vanraj Andekar) याची हत्या झाली होती. या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने वनराजच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या गणेश कोमकरचा (Ganesh Komkar) मुलगा आयुष कोमकर याला 9 गोळ्या झाडून संपवले होते. या टोळीयुद्धामुळे पुण्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आयुष कोमकरची हत्या झाली होती. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी आयुष कोमकरचा (Ayush Komkar Murder) मृतदेह दोन दिवस ससून रुग्णालयाच्या शवागारात ठेवला होता. अखेर काल म्हणजे सोमवारी संध्याकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत कडेकोट पोलीस बंदोबस्तात आयुष कोमकरच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Pune crime news)
आयुष कोमकरच्या अंत्यसंस्कारासाठी त्याचे वडील गणेश कोमकर याला तुरुंगातून पॅरोलवर सोडण्यात आले होते. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पुण्यात आणण्यात आले होते. आंदेकर गँगचा धोका लक्षात घेऊन गणेश कोमकरला कडेकोट पोलीस बंदोबस्तात वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आले. यावेळी स्मशानभूमीत जवळपास 100 ते 150 पोलीस हजर होते. यामध्ये पुण्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश होता. आयुष कोमकरच्या अंत्यविधीला तब्बल 125 नातेवाईक उपस्थित होते. या सगळ्यांची तपासणी करुन त्यांना स्मशानभूमीत सोडण्यात आले. गणेश कोमकरला पोलिसांच्या गाडीतून खाली उतरवण्यात आल्यानंतर त्याने आयुषने त्याला जेलमध्ये पाठवलेले ग्रिटींग कार्ड सगळ्यांना उंचावून दाखवले. यानंतर गणेश कोमकर आपल्या मुलाच्या मृतदेहापाशी गेला.
आयुषचा मृतदेह पाहताच गणेश कोमकरने हंबरडा फोडला. आयुषला घरी गोविंदा नावानेही हाक मारायचे. गणेश कोमकरने त्याचा मृतदेह पाहताच म्हणाला की, ए गोविंदा... परत ये... झोपलाय तो, पप्पा आलेत, उठायला सांग त्याला. हे काय झालं, चूक नसतानाही माझ्या मुलाला शिक्षा भोगावी लागली', असे गणेश कोमकर म्हणाला. त्यानंतर गणेश कोमकर बराचवेळ रडत होता. त्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांचे आभारही मानले. अंत्यविधी आटोपताच पोलिसांनी गणेश कोमकर याला लगेच गाडीत टाकून तिथून नेले. दरम्यान, पोलिसांनी आयुष कोमकरवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर सोमवारी रात्रीच बंडू आंदेकर याच्यासह सहा जणांना अटक केली. त्यामुळे पुण्यातील टोळीयुद्धाचा वणवा शमण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा























