Pune Crime: सामूहिक अत्याचार झालेल्या तरुणीला कॉलेजमधून का काढले? धंगेकरांचा सवाल
Pune Crime News: पुण्यातील कोरेगाव पार्क येथे आणखी एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यात सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून महाविद्यालयीन मुलीवर चार जणांनी बलात्कार केल्याची घटना उजेडात आली आहे.
पुणे: महिलांवरील अत्याचारांच्या सततच्या घटनेने राज्य हादरले असताना विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातून (Pune Crime News) अशीच एक खळबळजनक घटना पुढे आली आहे. यात सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून महाविद्यालयीन मुलीवर चार जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. कोरेगाव पार्क पोलिसांकडून या प्रकरणी पॉक्सोसह बलात्काराचा (Crime News) गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी अटक केली असून यातील दोन तरुण अल्पवयीन असल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेमुळे मात्र परिसरात मोठी खळबळ उडाली असून महिलांवरील अत्याचारांचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नसल्याचे चित्र आहे. परिणामी या प्रकरणावरुन काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे.
विद्येच्या माहेरघरात पुन्हा तोच प्रकार, विरोधक आक्रमक
पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक घटनांची मालिका सुरुच असतानाच पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील अल्पवयीन तरुणीवर त्याच महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची अशीच एक घटना ताजी असताना, आज परत एक अशीच घटना समोर आली आहे. दरम्यान, शिक्षणाच्या माहेर घरात हा प्रकार घडल्यामुळे विरोधक सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आज पुणे पोलीस आयुक्तालयात महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.
यावेळी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांनी याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तर हा प्रकार ज्या महाविद्यालयात सुरू होता तिथल्या प्रशासनावर सुद्धा कारवाई व्हावी, अशी मागणी केलीय. महाविद्यालयाचे नाव खराब होईल आणि प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून पिडीत तरुणीला कॉलेजमधून का काढले, असा सवाल सुद्धां या निमित्ताने विचारण्यात आला आहे.
खाजगी शिकवणी वर्गात शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार
पुणे पाठोपाठ बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे देखील अशीच एक घटना उजेडात आली आहे. यात एका इंग्लिश स्पिकिंग अकॅडमी चालविणाऱ्या शिक्षकाने सतरा वर्षीय विद्यार्थिनीला "तुला काहीही प्रॉब्लेम आल्यास मी आहे , काळजी करून नको..!" असं म्हणत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार पुढे आला आहे. गेल्या अनेक दिवसापासून हा शिक्षक या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थिनीने ही बाब आपल्या मैत्रिणींना सांगितली आणि मैत्रिणींनी विद्यार्थिनींच्या पालकांना सांगितली, त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.
जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध कलम 75 BNS सह कलम 8 पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे बदलापूर घटनेनंतर सरकारने सर्व शैक्षणिक संस्थांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास बंधनकारक केलं होतं , मात्र या इंग्लिश स्पिकिंग अकॅडमी आणि परिसरात कुठेही सीसीटीव्ही नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
हे ही वाचा