आईच्या प्रियकराचे मुलीसोबत अश्लील चाळे, नराधमास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बेड्या
Pimpri Chinchwad Crime : मुलीने वारंवार याची तक्रार तिच्या आईकडे करूनही आईने तिच्याकडे दुर्लक्ष केल्याने शेवटी त्या मुलीने शाळेतील शिक्षकांकडे तक्रार केली.
पुणे : आईच्या प्रियकरानेच चौदा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला. मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. पण तिने दुर्लक्ष केलं म्हणून मुलीने शाळेतील शिक्षिकेच्या कानावर ही बाब टाकली अन् नराधमाचे बिंग फुटले. पंकज धोत्रे असं त्याचं नाव असून रावेत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात.
मुलीने सुटका करून घेतली
रक्षाबंधन दिवशी पंकज धोत्रे त्या मुलीच्या घरीच होता. मुलीची आई कामावर तर भाऊ शाळेत गेला अन् धोत्रेने याचा फायदा घेतला. पंकज धोत्रेने मुलीला जवळ घेत तिच्याशी अश्लील चाळे करायला सुरुवात केली. मात्र यातून सुटका करून घेण्यासाठी ती जोराने ओरडू लागली. मग धोत्रेने तिला सोडून दिलं.
वर्षभरापूर्वीही धोत्रेने असेच कृत्य केलं होतं. मात्र मुलीने आईला सांगूनही तिने तुला असा भास झाला असेल असं म्हणत दुर्लक्ष केलं. मुलीचे आई आणि वडील गेली अनेक वर्षे सोबत राहत नाहीत. अशात त्या मुलीच्या आईची नराधम पंकजशी ओळख झाली. त्यांची जवळीक वाढली.
आई आणि प्रियकर एकाच ठिकाणी कामाला
आई अन धोत्रे दोघे नोकरी करतात. शिवाय या दोघांनी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह कंपनी टाकल्याची माहिती आहे. कंपनीत पार्टनर असणारे दोघे लाईफ पार्टनर असल्यासारखं वागत. पंकज धोत्रे नेहमीचं त्या घरात ये जा करतो असा आरोप पीडित मुलीने फिर्यादीत केलाय.
आई यावेळीही पंकज धोत्रेचीच बाजू घेणार असं त्या मुलीला वाटलं, म्हणून तिने शाळेतील शिक्षिकेला घडला प्रकार सांगितला. त्यानंतर शाळेत पोलिसांना बोलविण्यात आलं. रावेत पोलिसांत पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम पंकज धोत्रेला बेड्याही ठोकण्यात आल्यात. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी ही सुनावली आहे.
ही बातमी वाचा :