(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar : वेबसाईटवरून स्वस्त घरांचे आमिष दाखवायचा अन् अस्तित्वात नसलेली घरे विकायचा, लाखोंचा गंडा घालणाऱ्या महाठगाला अटक
Palghar Crime : वेगवेगळ्यान नावांचा वापर करून आपण मोठा बिल्डर असल्याचं भासवून या ठगाने अनेक नागरिकांना लाखोंचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे.
पालघर: आपण जर वेबसाईटवर स्वस्तात घर शोधत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. वेबसाईटवरून घरांची माहिती घेताना थोडी काळजी घेणं गरजेच आहे. आचोळे पोलिसांनी एका परराज्यातील महाठग बिल्डराला अटक केली आहे. त्याने प्रसिद्ध वेबसाईटवर अस्तित्वात नसलेल्या इमारतींमधील सदनिका विक्री करून नागरिकांना लाखोचा गंडा घातला होता. आचोले पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथिदाराला अटक केली आहे.
वसईत राहणाऱ्या या महाठग बिल्डरचं नाव सुमित वीरमनी दुबे (30) असं आहे. या महाठगाने टू स्टार रिअॅलिटी तर्फे महालक्ष्मी बिल्डर्स् ॲण्ड डेव्हलपर्स ही कंपनी तयार केली. महालक्ष्मी बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सच्या नावाने त्याने नो ब्रोकर, ऑनलाइन ओएलएक्स या वेबसाईटवर घरांची जाहिरात केली. बांधकाम सुरू असलेल्या इमारतींची छायाचित्रे अपलोड करून तो नागरिकांची दिशाभूल करायचा. अस्तित्वात नसलेल्या सदनिका नागरिकांना तो विकायचा. विशेष म्हणजे त्यांच्या नावावर बॅंकेतून कर्ज घेऊन ती रक्कम परस्पर लंपास देखील करत होता.
नालासोपारा परिसरातील लोकांना आपण मोठे बिल्डर असल्याचं भासवून प्लॅट खरेदी करणारे लोकांना बांधकामाच्या वेगवेगळ्या साईट दाखवून त्यांची फसवणूक करण्याची त्याची पद्धत होती. तो मोठमोठ्या राजकारण्यांबरोबर फोटोही काढायचा. अशाच प्रकारे प्रवीण मोरे आणि शोएब आलम अन्सारी यांना सुमित दुबे आणि त्याचे साथीदार यांनी ज्या ठिकाणी प्लॅट अस्तित्वात नाही अशा ठिकाणचे प्लॅट कमी किमतीत देतो असे सांगून, सहा लाख घेतले होते.
याप्रकरणी आचोळे पोलिसांनी सुमित दुबे आणि त्याचा साथीदार शुभम ऊर्फ बाबा गणेश मिश्रा या दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे सुमित दुबे हा सचिन पाटील, तुषार अशा नावांचा वापर ही करायचा. यांच्याकडून अशाप्रकारे फसवणूक केलेले माणिकपूर, आचोळे, तुळींज आदी विविध पोलीस ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी नागरिकांना या गुन्हेगारांनी कुणाला फसवलं असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याच आवहान केलं आहे.