Chhagan Bhujbal : छगन भुजबळांबाबत आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्याने खळबळ; 'त्या' युट्युब चॅनेलविरोधात गुन्हा दाखल
Chhagan Bhujbal : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत एक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते (NCP Ajit Pawar Faction) व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची खोटी बातमी एका बनावट व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्यात आली होती. या व्हिडिओमध्ये एका नामांकित टीव्ही चॅनलचा बनावट लोगो वापरण्यात आल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली. या खोट्या माहितीच्या प्रसारामुळे संभ्रम निर्माण झाला असून, याप्रकरणी नाशिक सायबर पोलीस (Nashik Police) ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारे दिशाभूल करणारी आणि खळबळजनक माहिती पसरवल्याबद्दल पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
नाशिक शहर आयुक्तालयाच्या विशेष शाखेचे अंमलदार सुनील बहारवाल यांनी शहर सायबर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, छगन भुजबळ यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल करणाऱ्या युट्युब चॅनेलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष शाखेकडून सोशल मीडियावर सतत ऑनलाईन सर्फिंग करून आक्षेपार्ह पोस्टवर करडी नजर ठेवली जाते. सर्फिंगदरम्यान, एका वृत्तवाहिनीचा लोगो वापरून "मंत्री छगन भुजबळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन" अशा मथळ्याखाली एक व्हिडिओ लिंक निदर्शनास आली. सदर लिंक तपासून पाहिली असता, त्यामध्ये प्रत्यक्षात श्रीमती रंजनीताई बोरस्ते यांच्या निधनाची बातमी होती, ज्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी युट्युबवर श्रद्धांजली अर्पण केली होती.
युट्युब चॅनेलविरोधात गुन्हा दाखल
मात्र, अज्ञात संशयिताने मुद्दाम भुजबळ यांच्या निधनाची खोटी टॅगलाईन वापरून ही पोस्ट सुमारे शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास युट्युबवर अपलोड केली. ही बनावट पोस्ट सुमारे सव्वा लाख लोकांपर्यंत पोहोचली, त्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होऊन अफवा पसरण्याची आणि जनक्षोभ उसळण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळे शहराच्या शांततेला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी "हेल्पलाईन किसान" या डिस्प्ले नावाने सुरू असलेल्या @Nana127tv या युट्युब चॅनेलविरोधात शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























