Chhagan Bhujbal on Raj Thackeray and Uddhav Thackeray : इकडं राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार, तिकडं भुजबळांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, मराठीच्या प्रश्नावर...
Chhagan Bhujbal on Raj Thackeray and Uddhav Thackeray : हिंदी सक्तीविरोधात एकत्र आणि एकच मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Chhagan Bhujbal on Raj Thackeray and Uddhav Thackeray : महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात वातावरण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) एकत्रितपणे मोर्चा काढण्याचा प्रस्ताव दिला होता. दोन स्वतंत्र मोर्चे न काढता, एकत्र येऊन या मुद्द्यावर लढा देण्याचा मनसेचा ठाम आग्रह होता. आता याच संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. हिंदी सक्तीविरोधात एकत्र आणि एकच मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. त्यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. या घोषणेमुळे राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हिंदी सक्तीविरोधात एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता यावर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, राजकारणात काय होईल हे काहीही सांगता येत नाही. कोणाची कधी युती होईल, कुठला पक्ष कुठे जाईल? हे सांगणे कठीण आहे. दोन्ही पवार एकत्र यावे, दोन्ही ठाकरे यावे, असं अनेकांना वाटतं. परंतु राजकारणात हे घडतंच असं नाही. मराठीच्या प्रश्नावर एकत्रित लढा देत आहेत ते ठीक आहे. शिवसेना मूळ पक्ष मराठीच्या प्रश्नावर स्थापन झाला. मराठी माणसाला नोकरी, धंदा, व्यवसाय यांसह इतर गोष्टींसाठी प्राधान्य मिळाले पाहिजे. त्यासाठी शिवसेनेने प्रश्न निर्माण केला होता. वसंतदादा पाटील त्यावेळी मुख्यमंत्री होते. ते म्हटले होते की, महाराष्ट्रात मुंबई आहे. परंतु मुंबई महाराष्ट्र नाही. तोच धागा पकडून बाळासाहेबांनी शिवसेनेचे वातावरण पेटवले होते. त्यातून शिवसेनेची एक वेगळी सुरुवात झाली आहे.
ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही, पण..
त्यामुळे मराठीसाठी एकत्र येणं हे मला काही वेगळं वाटत नाही. त्यातून जर निर्णय घेतला असेल तर ठीक आहे. त्यावर ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही. पण, एक लक्षात घेतलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, या सगळ्याची चर्चा करून मग निर्णय घेतला जाणार आहे. सर्व वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करून मगच यावर निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितले आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा























