(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोलापुरातील शरद पवारांच्या कट्टर समर्थकावर गुन्हा दाखल, बँकेत फसवणूक केल्याचा आरोप
सोलापूर जिल्ह्यातील शरद पवार यांचे कट्टर समर्थक अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांच्यावर राज्य सहकारी बँकेने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कार्यकर्त्यांनी कारखाना कार्यक्षेत्रावर आंदोलन सुरु केले आहे.
सोलापूर : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या नेत्यांची विविध संस्थानाकडून चौकशा सुरु आहेत. आता सोलापूर जिल्ह्यातील शरद पवार यांचे कट्टर समर्थक अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांच्यावर राज्य सहकारी बँकेने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कार्यकर्त्यांनी कारखाना कार्यक्षेत्रावर आंदोलन सुरु केले आहे.
अभिजीत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वी अभिजित पाटील यांच्यावर आयकर विभागानेही छापे टाकले होते . मात्र आता शिखर बँकेच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर राष्ट्रवादी समर्थक कार्यकर्ते आणि कारखान्याच्या शेतकरी सभासदांनी कारखान्याच्या गेटसमोर आंदोलन सुरु केले आहे .
फसवणुकीचा गुन्हा दाखल -
अभिजीत पाटील हे शरद पवार गटाचे कट्टर समर्थक असून ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. कारखान्याकडे राज्य सहकारी बँकेचे जवळपास साडेचारशे कोटीहून अधिक थकीत रक्कम आहे. ही थकीत रक्कम कारखान्याने बँकेकडे भरली नसल्याने राज्य सहकारी बँकेने पंढरपूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार रात्री उशिरा विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासह वीस संचालकांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये बँकेची फसवणूक केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाव्य उमेदवार, आता कायद्याच्या कचाट्यात -
अभिजीत पाटील हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून ओळखले जातात. जून 2022 मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अभिजीत पाटील यांचे पॅनल निवडून आले आहे. पूर्वीच्या संचालक मंडळाने राज्य सहकारी बँकेकडून वेळोवेळी कर्ज घेतले आहे. ते आज मितीस जवळपास साडेचारशे कोटीहून अधिकची रक्कम थकीत आहे.
अटकपूर्व जामीन मिळाला -
त्यामुळे राज्य सहकारी बँकेने थकीत रक्कम वसूल करण्यासाठी संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या अभिजित पाटील याना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. दरम्यान राजकीय द्वेषा पोटी माझ्यावर आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला असल्याची प्रतिक्रिया विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी आमदार रोहित पवार यांनी कारखाना अडचणीत आणणाऱ्या एका नेत्याने भाजपात येण्याच्या अटीवर कारवाईसाठी हट्ट धरल्याचे आरोप केला होता. त्यामुळे आता या सर्व प्रकरणाला राजकीय रंग येण्याची शक्यता असली तरी विठ्ठल कारखान्याकडे राज्य सहकारी बँकेचे कोट्यवधी रुपये थकीत असून सध्या सत्ता अभिजित पाटील यांच्याकडे असल्याने त्यांचेवर बँकेकडून कारवाई करण्यात आली आहे.