(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navi Mumbai Crime : प्रियकराची भेट घडवून देण्याच्या बहाण्याने तरुणीला नऊ लाखांचा चुना, ॲानलाईन पैसे मागत फसवणूक
Navi Mumbai Crime : ब्रेकअप झालेल्या प्रियकराची पुन्हा भेट घडवून देण्याच्या बहाण्याने प्रेमात आंधळ्या झालेल्या तरुणीला नऊ लाख रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे ॲानलाईन पद्धतीने टप्प्याटप्प्याने पैसे उकळत तरुणीची फसवणूक केली आहे.
Navi Mumbai Crime : ब्रेकअप झालेल्या प्रियकराची (Boyfriend) पुन्हा भेट घडवून देण्याच्या बहाण्याने प्रेमात आंधळ्या झालेल्या तरुणीला नऊ लाख रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे ॲानलाईन पद्धतीने टप्प्याटप्प्याने पैसे उकळत तरुणीची फसवणूक केली आहे. फसवणूक झालेली तरुणी ही आयटी कंपनीत कम्प्युटर इंजिनीअर म्हणून काम करते. नवी मुंबईत (Navi Mumbai) ही घटना घडली आहे. खारघर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
प्रियकरासोबत ब्रेकअप झाल्याने तरुणी अस्वस्थ
या तरुणीचे नांदेड इथल्या अभिषेक नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबध होते.मात्र काही कालांतराने दोघांमध्ये झालेल्या वादामुळे प्रेमात दुरावा आला. अभिषेकने संबंधित तरुणीशी कायमचे संबंध तोडले होते. अभिषेकबरोबर या तरुणीचा प्रेमभंग झाला असला तरी त्याच्या आठवणीने मात्र घायाळ झाली होती. तिने परत एकदा अभिषेकला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फोन बंद असल्याने तो होऊ शकला नाही. कोणत्याही प्रकारे, काहीही झाले तरी आपल्या प्रियकराला परत गाठायचंच या भावना तरुणीला शांत बसू देत नव्हती. अखेर यासाठी तिने सोशल मीडियातील मायाजाळाचा आधार घ्यायचा निर्णय घेतला. अभिषेकला जादूच्या शक्तीने तिच्यापर्यंत कोणीतरी घेऊन येईल, अशा व्यक्तीच्या शोधात ही तरुणी होती. त्यासाठी तिने गुगल, यूट्यूब यासारख्या सोशल मीडियावर सर्च करण्यास सुरुवात केली.
तरुणीकडून सोशल मीडियावर जादू करणाऱ्याचा शोध
सोशल मीडियावर शोध मोहीम सुरु असतानाच तिला रुखसार नावाच्या तरुणीच्या प्रोफाईलवर जादूची शक्ती (मॅजिक पॉवर) करणाऱ्यांची माहिती असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या तरुणीने रुखसारला संपर्क साधल्यानंतर तिने खानसाहेब हा मॅजिक पॉवरने तिच्या प्रियकराला तिच्यापर्यंत घेऊन येईल, असे सांगितले. तसंच त्याचा मोबाईल नंबर दिला. तरुणीने त्याच दिवशी खानसाहेब याला संपर्क साधून तिच्या प्रियकराने तिच्यासोबत पूर्वीप्रमाणे प्रेम करावे, असे काही तरी जादू करावी, असं तरुणीने त्याला सांगितलं. या कामासाठी खानसाहेबने अभिषेकचा फोटो आणि 50 हजार रुपयांची मागणी केली. यानंतर तरुणीने खानसाहेबला अभिषेकचा फोटो आणि 50 हजार रुपये पाठवून दिले.
भामट्या खानसाहेबकडून सातत्याने पैशांची मागणी
चार दिवसानंतर तरुणीने भामट्या खानसाहेब याला संपर्क साधून आपल्या कामाबाबत विचारणा केली असता, त्याने अभिषेकसोबत काम करणाऱ्याला अटक झाल्याने काम झालं नसल्याचं सांगितलं. तसंच संबंधित काम पुन्हा करण्यासाठी आणखी 1 लाख 75 हजार रुपयांची मागणी केली. खानसाहेब याच्यावर विश्वास ठेवून ही रक्कम देखील तरुणीने पाठवून दिली. मात्र त्यानंतर देखील काम न झाल्याने भामट्या खानसाहेबने अभिषेकसोबत काम करणारा त्याचा मामू मयत झाल्याचं कारण सांगितलं. त्यानंतर एक लाख रुपये दिल्यास अभिषेक पुन्हा तिच्यावर प्रेम करायला लागेल अशी जादू करण्याचे आश्वासन त्याने दिलं. त्यानुसार तरुणीने पुन्हा त्याला एक लाख रुपये पाठवून दिले.
आरोपीचा शोध सुरु
अशाच पद्धतीने खानसाहेबने वेगवेगळी कारणं सांगून तरुणीकडून थोडे-थोडे करुन एकूण 8 लाख 95 हजार रुपये उकळले. इतके पैसे दिल्यानंतर देखील प्रियकर अभिषेकसंदर्भात खानसाहेबकडून काहीच काम न झाल्याने आपली फसवणूक होत असल्याचे तरुणीच्या लक्षात आलं. त्यामुळे तरुणीने खानसाहेबकडे आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केल्यानंतर त्याने मोबाईल फोन बंद करुन टाकला. त्यानंतर या तरुणीने आपल्या मैत्रिणींसोबत सल्लामसलत करुन खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार खारघर पोलिसांनी भामट्या खानसाहेब विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.