Nashik Crime : शाळेतील वाद खासगी क्लासपर्यंत, बाकावर बसण्यावरून दोन विद्यार्थ्यांनी मित्रालाच लाथा-बुक्क्यांनी हाणून संपवलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Nashik Crime : नाशिकच्या सातपूर परिसरात एका खाजगी क्लासमधील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे.

Nashik Crime : नाशिकच्या सातपूर (Satpur) परिसरात एका खाजगी क्लासमधील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. बाकावर बसण्याच्या वादातून हाणामारीत एकाची हत्या करण्यात आलीय. दहावीत शिकणाऱ्या मित्रांनीच त्याच्या एका मित्राला लाथा बुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
यशराज गांगुर्डे असे मृत मुलाचे नाव आहे. बुधवारी यशराज आणि क्लासमधील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये केवळ बेंचवर बसण्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद तिथेच थांबला नाही. याच वादातून क्लासच्या आवारात तिघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि यशराजला दोघांनी मिळून बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी गंभीर होती की यशराजचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. यात दोन विधी संघर्षीत बालकांना देखील ताब्यात घेतले आहे.
संबंधित विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा व्हावी
मित्रांमधला वाद हा शाळेपासून खाजगी क्लासेसपर्यंत देखील पोहोचला. मात्र, या वादाकडे ना पालकांनी लक्ष दिलं ना संबंधित शिक्षकांनी. मात्र, घटनेनंतर खाजगी शिकवणीच्या संस्था मोठ्या प्रमाणात फी घेतात मात्र विद्यार्थ्यांना योग्य सुविधा उपलब्ध होत नाही किंवा मुलांकडे देखील फारसं लक्ष दिलं जात नाही, असं मयत मुलाच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. घटनेतील संबंधित विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मयत मुलाच्या कुटुंबाने केली आहे.
अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
दरम्यान, नाशिक शहर पोलीस आयुक्तांकडून शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे 'पोलीस आपल्या दारी' हा उपक्रम देखील घेण्यात आला. मात्र, शहरातील गुन्हेगारी ही थांबण्याचे नाव घेत नाही. शहरातील गुन्हेगारीत सर्वाधिक घटना या अल्पवयीन गुन्हेगारांच्या समोर येत आहेत. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवणे आणि टोकाचे पाऊल उचलणे या घटनांमुळे अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
Nashik Crime : मालेगावमध्ये तरुणाची हत्या
दरम्यान, (दि.1) ऑगस्ट रोजी मालेगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. मागील भांडणाच्या वादातून रस्त्यावर दुचाकी सुरू करत असलेल्या 25 वर्षीय तरुणावर तिघा हल्लेखोरांनी लाकडी दांडक्याने व चाकूने सपासप वार करीत त्याचा निघृण खून केला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाच्या डोक्यावर दगड टाकून हल्लेखोर फरार झाले होते. जुना आग्रा रोडवर, सुझुकी शोरूमसमोर हा प्रकार घडला होता. नितीन अर्जुन निकम उर्फ रितिक (25) असे मृत तरुणाचे नाव आहे.
आणखी वाचा
मोठी बातमी: मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळली, दरवाजा तोडून बाहेर























