Nashik Crime : क्रूरतेचा कळस! धारधार शस्त्र, लाकडी दांडके अन् चेहऱ्यावर दगड मारून युवकाचा खात्मा; नाशिकमधील घटनेने खळबळ
Nashik Crime : मालेगावच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नानावटी पेट्रोल पंपाजवळ एका युवकाला तीन अज्ञात हल्लेखोरांनी संपवले आहे.

Nashik Crime : नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव (Malegaon) शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नानावटी पेट्रोल पंपाजवळ काल (दि. 31 जुलै) रात्रीच्या सुमारास एका युवकाचा तीन अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण खून केला. नितीन अर्जुन निकम (वय अंदाजे 30), असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, तो मालेगाव महापालिकेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन निकम हा नानावटी पेट्रोल पंपाजवळ उभा असताना तिघेजण दुचाकीवरून आले आणि त्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्र, लाकडी दांडके आणि दगडांनी हल्ला चढवला. हल्लेखोरांनी त्याच्या चेहऱ्यावर दगड घालून त्याला ठार मारलं. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
मागील आठवड्यात गोळीबार, आता निर्घृण खून
या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमॉर्टेम) पाठवण्यात आला आहे. दरम्यान, हल्ल्याचं नेमकं कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून तपास सुरु आहे. गेल्याच आठवड्यात मालेगावात गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर आता धारदार शस्त्रांचा वापर करून एका युवकाचा खून झाल्यामुळे शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
Nashik Crime : अश्लील व्हिडिओ काढत पत्नीला डान्सबारमध्ये नाचवले, गुन्हा दाखल
दरम्यान, पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नाशिकच्या हिरावाडी येथे घडली आहे. पतीने पत्नीला गुंगीचे औषध देऊन तिचे अश्लील व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. तर वेळोवेळी मारहाण आणि शिवीगाळ करून जबरदस्तीने डान्सबारमध्ये नाचण्यास भाग पाडले, असे गंभीर आरोप पत्नीने केले आहे. पिडीत महिलेच्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलिसात पती पवन गाडेकर आणि त्याचा मित्र अक्षय गांगुर्डे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोघेही फरार असून पंचवटी पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























