Nashik News : महामार्गावर प्रवाशांच्या गाड्या फोडून करायचे लुटमार, पोलिसांनी दोघांच्या आवळल्या मुसक्या
Nashik News : मुंबई-आग्रा महामार्गावर प्रवाशांच्या गाड्यांची तोडफोड करत कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 97 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Nashik Crime News नाशिक : मुंबई - आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) प्रवाशांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर प्रवाशांना कोयत्याचा धाक दाखवत किंमती ऐवजाची लुटमार करण्यात आली होती. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
या दोघांचा तिसरा साथीदार गावठी पिस्तुल बाळगल्याप्रकरणी सध्या मध्यवर्ती कारागृहात दाखल आहे. तौसिफ लुकमान पठाण उर्फ गफुर बस्ती, (30, रा. नानावली, मानुर रोड), प्रविण उर्फ चाफा निंबानी काळे (24, रा. आम्रपाली झोपडपट्टी, कॅनॉल रोड, उपनगर) अशी संशयितांची नावे आहेत. मोहम्मद अन्वर सय्यद (रा. स्वामी समर्थ हौसिंग सोसायटी, नानावली, जुने नाशिक) हा सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashikroad Central jail) दाखल आहे.
दोन ठिकाणी केली लुटमार
याबाबत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात 01 जानेवारीला किरण कावळे (रा. ठाणे) हे त्यांच्या मित्रांसह रस्त्यालगत रात्रीच्या वेळी थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या संशयित तिघांनी त्यांच्या कारची काच फोडून कोयत्याचा धाक दाखविला. त्यांनतर किरण व त्यांच्या मित्रांकडील सोन्याच्या चैन, मोबाईल व रोकड, असा 70 हजार 570 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी घोटी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांकडून लुटमार केल्याची कबुली
तसेच वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीनकुमार जैन (रा. मुंबई) यांच्या गाडीची काच फोडून शस्त्रांचा धाक दाखवून 82 हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हेशाखेकडून सुरु होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तौसिफ आणि प्रवीण या दोघांना जुने नाशिक परिसरातून बेड्या ठोकल्या. संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांच्या तिसरा साथीदार मोहम्मद यांच्या मदतीने मुंबई आग्रा महामार्गावर लुटमार केल्याची त्यांनी कबुली दिली.
संशयित आरोपी सराईत गुन्हेगार
दोघा संशयितांकडून 9 मोबाईल, सोन्याची चेन आणि दुचाकी, असा एकूण 97 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयित हे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्याविरोधात नाशिकमधील भद्रकाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यांनी बजावली कामगिरी
ही कामगिरी अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सहायक निरीक्षक गणेश शिंदे, हवालदार नवनाथ सानप, पोलीस नाईक विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, मनोज सानप, भुषण रानडे यांच्या पथकाने बजावली.
आणखी वाचा
आधी भावजींनी काँग्रेसची साथ सोडली, आता अशोक चव्हाणांचे दाजीही म्हणतात...