Nashik Crime : आधी व्याह्यानेच व्याह्याला संपवलं, नंतर बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव रचला, पण 'त्या' चुकीनं झाला भांडाफोड; नाशिकमधील घटना
Nashik Crime : व्याह्यानेच व्याह्याचा खून करून त्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे.

Nashik Crime : नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा (Surgana) तालुक्यातील पळसनजवळील हातरुंडी गावात गुरुवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. व्याह्यानेच व्याह्याचा खून करून त्याचा बिबट्याच्या (Leopard) हल्ल्यात मृत्यू झाल्याचा खोटा बनाव रचला. या बनावाचा पर्दाफाश करत सुरगाणा पोलिसांनी संशयित आरोपीला गजाआड केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवराम नाना गावित (65, रा. हातरुंडी) हे गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेतातील झापावर झोपले होते. यावेळी त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे सांगून संशयित आरोपी शिवराम गंगा गवळी (रा. हातरुंडी) गावात आला आणि ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी तत्काळ देवराम यांना पळसन आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याच्या तयारीत त्यांना घरी आणले. सकाळी बिबट्याच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगून संशयित आरोपीने वनविभाग आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावले. मात्र तपासणीदरम्यान शेतात बिबट्याचे पावलांचे कोणतेही ठसे आढळून आले नाहीत.
बनावाचा भांडाफोड
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, सुरगाणा येथे पाठवला. याचवेळी घराची झडती घेताना भिंतींवर रक्ताचे डाग व काही संशयास्पद वस्तू रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडल्या. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्याचा संशय गळून पडून खुनाचा स्पष्ट अंदाज आला. त्यानंतर मयताचा मुलगा हिरामण देवराम गावित यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शिवराम गवळी यास पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलीस व वनविभागाचा तपास
या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी, पोलिस उपविभागीय अधिकारी कळवणचे पोलीस निरीक्षक आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सुरगाणा पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करीत असून, आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे हातरुंडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























