Nashik Crime News : जुन्या वादाची खुन्नस, टोळक्याकडून एकास जबर मारहाण, डोक्यावर घाव घालताना हात आडवा केला अन्...
Nashik Crime News : स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतताना जुन्या वादाची खुन्नस काढत एकाला टोळक्याने जबर मारहाण केल्याची घटना ओझर टाऊनशिप येथे उघडकीस आली आहे.
Nashik Crime News : नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day 2024) कार्यक्रम आटोपून घरी परतताना जुन्या वादाची खुन्नस काढत एकावर टोळक्याने कोयत्याने सपासप वार केल्याची घटना ओझर टाऊनशिप (Ozer Township) येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) एका विधीसंघर्षित बालकासह तिघांना अवघ्या काही तासातच बेड्या ठोकल्या आहेत.
ओझर टाऊनशिप येथील स्टेडियम कॉम्प्लेक्समधील (Stadium Complex ozar Township) स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम उरकून घरी परतत असताना नितीन गांगुर्डे (Nitin Gangurde) यांना तीन जणांनी मागील भांडणाची कुरापत काढून कोयत्याने मारहाण केली. या मारहाणीत डोक्यावर घाव घालण्याच्या नादात गांगुर्डे यांनी हात आडवा केल्यामुळे ते बालंबाल बचावले. मात्र, गांगुर्डे यांच्या डाव्या हाताचे बोट तुटले तर तीन बोटांना गंभीर दुखापत झाली आहे.
जुन्या भांडणाची कुरापत काढून कोयत्याने सपासप वार
याबाबत अधिक माहिती अशी की, रोहन आहिरे, अमित रामोशी आणि करण जाधव यांनी नितीन गांगुर्डे यास गाठले होते. सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी दिक्षी येथे एका लग्नसमारंभात घोडा घेऊन आलेल्या नितीन गांगुर्डे यांच्याशी त्यांचा काही वाद झाला होता. जुन्या वादाच्या रागातून आपल्या घराकडे जाणाऱ्या नितीन गांगुर्डे यांच्यावर अमित रामोशी आणि करण जाधव यांनी कोयत्याने वार केला.
डोक्यावर घाव घालताना हात आडवा केला अन्...
या मारहाणीत डोक्यावर घाव घालण्याच्या नादात गांगुर्डे यांनी हात आडवा केल्यामुळे ते बालंबाल बचावले. मात्र, गांगुर्डे यांच्या डाव्या हातावरील करंगळी तुटली तर इतर तीन बोटांना देखील गंभीर दुखापत झाली आहे.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी ओझर पोलिसांनी तातडीने धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. हल्ला करून आरोपी पसार झाले होते. यानंतर पोलिसांनी गुन्हा दखल होण्यापूर्वीच तातडीने पिंपळगाव येथून आरोपींना काही तासातच ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली. याप्रकरणी विधीसंघर्षित बालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या