Navi Mumbai Crime: गणिताच्या पेपरसाठी आई-पप्पांनी अभ्यासाचा तगादा लावला, बॅगमध्ये कोल्ड्रिंक, चॉकलेट भरुन चिमुकलीने घर सोडलं, नवी मुंबईतील पोलिसांची पळापळ
Nerul in Navi Mumbai: नेरुळमध्ये एक लहान मुलगी घरातून पळून गेल्याने पालकांच्या जीवाला घोर लागला होता. पालक या मुलीला गणिताच्या पेपरचा अभ्यास करायला सांगत होते. ही मुलगी बॅग घेऊन घरातून बाहेर पडली आणि एका सोसायटीच्या आवारात झोपली
नवी मुंबई: आपल्यापैकी अनेकांना लहानपणी शाळेचा अभ्यास करण्यासाठी किंवा परीक्षेच्यावेळी पालकांचा 'अभ्यासाला बस, अभ्यासाला बस' असा धोशा लावण्याचे दिवस आजही आठवत असतील. त्यावेळी ही बाब अगदी सामान्य आणि विद्यार्थ्यांच्या अंगवळणी पडली होती. परंतु, नवी मुंबईत (Navi Mumbai) पालकांनी अभ्यासाचा (School Student) तगादा लावल्याने सातवी इयत्तेमधील मुलीने घर सोडल्याची घटना समोर आली आहे. यामुळे पालक आणि पोलिसांची प्रचंड पळापळ झाली. सरतेशेवटी ही लहान मुलगी सुखरुप सापडल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.
नवी मुंबईच्या नेरुळ परिसरात हा प्रकार घडला. संबंधित मुलगी ही एका नामांकित शाळेत (School) सातवी इयत्तेमध्ये आहे. बुधवारी तिचा गणित विषयाचा पेपर होता. त्यासाठी मुलीचे आई-वडील अभ्यासासाठी तिच्या मागे लागले होते. पालकांच्या या सततच्या धोशाला कंटाळून ही मुलगी चक्क बॅग घेऊन घरातून निघून गेली. मुलीने घरातून बाहेर पडताना, 'मम्मी-पप्पा, आय हेट यू', अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी पालकांच्या हाती लागताच त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. नेरुळ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपासाला सुरुवात केली. अखेर रात्री 1 वाजता उलवे येथील एका सोसायटीच्या आवारात ही मुलगी सुखरुप सापडली.
घरातून निघताना चिमुरडीने बॅगेत कोल्ड्रिंक आणि चॉकलेट भरली
अभ्यासासाठी मागे लागलेल्या आई-वडिलांवर चिडून ही चिमुरडी चांगलीच घुश्शात घराबाहेर पडली होती. आपण आता बाहेरच राहायचे, असा चंग जणू तिने बांधला होता. त्यासाठी या चिमुरडीने घराबाहेर पडताना कोल्ड्रिंक, चॉकलेट आणि पाण्याची बाटली अशा सर्व वस्तू बॅगेत भरल्या होत्या. घरातून बाहेर पडल्यावर ही मुलगी उलवे येथील सेक्टर 19 मध्ये असणाऱ्या द्वारकानाथ सोसायटीच्या आवारात गेली. तिच्याकडे बॅग असल्यामुळे सोसायटीच्या सुरक्षारक्षकांना ही मुलगी सोसायटीमध्येच राहणारी असावी, असे वाटले. या मुलीने तिच्या बॅगेतील चॉकलेट खाऊन रात्र उघड्यावरच काढली. त्यानंतर ही मुलगी सोसायटीच्या भिंतीलगत झोपली. तिला खाली झोपल्याचे पाहून सोसायटीच्या सुरक्षारक्षकांना संशय आला आणि त्यांनी लगेच पोलीस ठाण्यात फोन करुन याबद्दल माहिती दिली आणि या सगळ्याचा उलगडा झाला.
आणखी वाचा
पप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल; कल्याणमध्ये शाळकरी विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं