Nashik Crime : शेअर ट्रेडिंगचं आमिष भोवलं, बँक मॅनेजरला 40 लाखांचा गंडा तर तिघांची तब्बल 93 लाखांची फसवणूक
Nashik Crime News : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून अनेक अधिकारी, व्यावसायिक, उद्योजक, नोकरदार व अभियंत्यांची सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये शेअर ट्रेडिंगचे (Share Market Trading) आमिष दाखवून अनेक अधिकारी, व्यावसायिक, उद्योजक, नोकरदार व अभियंत्यांची सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच आता पुन्हा एकदा शहरातील एका बँकेच्या ब्रान्च मॅनेजरसह अन्य नोकरदार व व्यावसायिकांकडून सुमारे 1 कोटी 33 लाख रुपये उकळून गंडा (Fraud) घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अनोळखी संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एक लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर थेट दरमहा 30 ते 40 हजार रुपयांचा परतावा आणि वनटाईम इन्व्हेस्टमेंटमधील रक्कम तिप्पट करुन देण्याचे सांगून हा गंडा घालण्यात आला आहे. तसेच शहरातील एका बँकेत मॅनेजर (Bank Manager) असलेल्या व्यक्तीसह अन्य तिघा तक्रारदारांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार बँक मॅनेजरकडून 45 लाख रुपये उकळून 5 लाखांचा परतावा देत उर्वरित पैसे परत न करता फसवणूक केली.
बनावट प्लॅटफार्मवर उघडले खाते
तसेच, अन्य तिघांकडून 93 लाख रुपये घेत फसवणूक केली आहे. सायबर चोरट्यांनी 22 मार्च ते 31 जुलै 2024 या पाच महिन्यांच्या कालावधीत बँक मॅनेजरसह अन्य तिघांना व्हाट्सअॅपमार्फत संपर्क केला. तसेच शेअर ट्रेडिंगच्या विविध सोशल मिडीया प्लॅटफार्मवरील जाहिराती दाखविल्या. यानंतर बनावट कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यास भाग पाडले. सोबतच शेअर ट्रेडिंग, स्टॉकबद्दल वेळोवेळी माहिती देत विश्वास संपादन करुन संशयितांनी वेगवेगळ्या बोगस कंपनींच्या बनावट ट्रेडींग प्लॅटफार्मवर खाते उघडण्यास प्रवृत्त केले.
बँक मॅनेजरला 40 लाखांचा गंडा तर तिघांची 93 लाखांची फसवणूक
याचवेळी विविध संशयास्पद अॅपवर विविध कंपन्याचे स्टॉक आणि ‘आयपीओ’ घेण्याकरीता लिंक केलेल्या बँक खात्यांची माहिती मागवून घेतली. सोबतच विविध बँकेच्या खात्यांवर बँक मॅनेजरला 44 लाख 45 हजार रुपये आयसीआयसीआय बँकेच्या अकाऊंटमधून भरण्यास भाग पाडले. तर, बँक मॅनेजरला संशय येऊ नये यासाठी वरील कालावधीत एकूण 5 लाख 48 हजार रुपयांचा परतावा देखील दिला. मात्र, उर्वरीत 39 लाख 46 हजार रुपये परत न देता त्यांची फसवणूक केली. अशाच पद्धतीने इतर तिघांची 93 लाख रुपये उकळून फसवणूक केली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या