वाहनधारकांकडून उकळत होता अवैधरित्या पैसे, नाशिक एसीबीचं पथक गोंदियाच्या चेक पोस्टवर पोहोचलं अन् अधिकारी सापडला जाळ्यात
Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील देवरी शिरपूर येथील आरटीओ चेक पोस्टवर कार्यरत असलेल्या इन्स्पेक्टरला नाशिक एसीबीने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.

Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील देवरी शिरपूर येथील आरटीओ चेक पोस्टवर कार्यरत असलेले इन्स्पेक्टर योगेश खैरनाग (Inspector Yogesh Khairnag) यांना नाशिक येथील अँटी करप्शन ब्युरोच्या (Nashik ACB) पथकाने लाच (Bribe) घेताना रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे.
योगेश खैरकर हे वाहनधारकांकडून अवैधरित्या पैसे उकळत असल्याची माहिती अँटी करप्शन विभागाकडे आली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत, अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी योजनाबद्ध पद्धतीने सापळा रचला. त्यानुसार अचूक वेळ साधत ही कारवाई करण्यात आली आणि योगेश खैरनाग यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु
या घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे. इन्स्पेक्टर योगेश खैरनाग यांना देवरी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलं आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इन्स्पेक्टर योगेश खैरनाग यांनी नेमकी किती लाच घेतली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन
कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किवा त्यांच्यावतीने कोणीही कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिक 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकतात.
दोन लाखाची लाच स्वीकारताना गटविकास अधिकारी जाळ्यात
दरम्यान, रोजगार हमी योजनेतील थकीत देयक काढून देण्याच्या मोबदल्यात दोन लाख 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा पंचायत समितीतील गटविकास अधिकारी महेश पोतदार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मार्च महिन्यात रंगेहात ताब्यात घेतले होते. पोतदारच्या शहरातील घराच्या झडतीत दोन लाखाहून अधिक रोकड आणि मालमत्तेची कागदपत्रे आढळली. तक्रारदार हे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत सुरगाणा तालुक्यातील गावांमध्ये पुरवठादार म्हणून काम करतात. त्यांचे या योजनेतील दोन कोटी 32 लाख 30 हजार 27 रुपयांचे देयक थकीत आहे. हे देयक काढण्याच्या मोबदल्यात सुरगाणा पंचायत समितीतील गटविकास अधिकारी (वर्ग एक) महेश पोतदार याने तक्रारदाराकडे दोन लाख 10 हजार रुपयांची लाच मागितली. पोतदारने पंचांसमोर दोन लाख 10 हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली. ही रक्कम स्वीकारत असताना पथकाने पोतदारला रंगेहात पकडले होते.
आणखी वाचा
























