Nandurbar Crime : ATM मध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्याचा पैशांवर डल्ला, बॅकअप चावीच्या सहाय्याने विविध एटीएममधून 63 लाख रुपये लुटले
Nandurbar Crime : बॅकअप चावी मिळवून एटीएममध्ये पैसे भरणार्या कर्मचार्याने विविध एटीएममधून रक्कम काढत तब्बल 62 लाख 91 हजार 500 रुपये लांबवल्याचा प्रकार नंदुरबारमध्ये समोर आला आहे.
Nandurbar Crime : एटीएममधून पैसे लुटण्याचे प्रकार नवीन नाहीत. जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट घडवून, मशीन फोडून पैसे चोरण्याच्या घटना पाहिल्या आहेत. नंदुरबारमध्ये एटीएम चोरीचा अनोखा प्रकार समोर आला. एटीएम (ATM) उघडण्याची एक्स्ट्रा बॅकअप चावी (Back Up Key) मिळवून एटीएममध्ये पैसे भरणार्या कर्मचार्याने विविध एटीएममधून रक्कम काढत तब्बल 62 लाख 91 हजार 500 रुपये लांबवल्याचा प्रकार नंदुरबारमध्ये (Nandurbar) उघडकीस आला आहे. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल प्रभाकर मानकर यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. पंकज किशोर चौधरी असं आरोपीचं नाव आहे.
पाच एटीएममधून 63 लाख रुपये लांबवले
ही घटना 5 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीत घडली आहे. पंकज किशोर चौधरी असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. एटीएममध्ये पैसे भरण्याचे आदेश नसताना या कर्मचार्याने बॅकअपची चावी स्वत:जवळ ठेवून नंदुरबार आणि नवापूर (Navapur) इथल्या पाच एटीएममधून रक्कम काढली. तसंच बँकेने एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेली रक्कम लांबवली आहे.
कंपनीकडून मिळवलेली एक्स्ट्र बॅकअप चावी स्वत:कडेच ठेवली
नंदुरबार येथील भाट गल्लीत राहणारा पंकज किशोर चौधरी हा सीएमएस इन्फो सिस्टम लिमिटेड कंपनीचा (CMS Info Systems) अधिकृत कर्मचारी आहे. एटीएमध्ये पैसे भरण्याचे कोणत्याही प्रकारचे आदेश नसताना पंकज चौधरीने कंपनीकडून एक्स्ट्रा बॅकअप चावी मिळवली. एटीएम उघडण्याची एक्स्ट्रा बॅकअप चावी कंपनीला परत न करता त्याने ती स्वत:कडे ठेवून घेतली. या चावीच्या साहाय्याने त्याने तब्बल 63 लाख रुपये लंपास केले.
कोणकोणत्या बँकेतून किती पैसे लुटले?
एक्स्ट्रा बॅकअप चावी असल्याचा फायदा घेत पंकज किशोर चौधरीने नंदुरबार शहरातील मिराज सिनेमा इमारतीमधील एसबीआयच्या (SBI) एटीएममधून 16 लाख रुपये, सिंधी कॉलनीतील एबीआयच्या एटीएममधून 21 लाख 99 हजार 500 रुपये, नवापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या (Bank of Maharashtra) एटीएममधून 10 लाख रुपये, नवापुरातील युनियन बँक ऑफ इंडियाचा (Union Bank of India) एटीएममधून 9 लाख 92 हजार रुपये, नवापूर तालुक्यातील रायंगण येथील एसबीआयच्या एटीएम मशिनमधून 5 लाख रुपये अशा पाच ठिकाणच्या एटीएममधून तब्बल 62 लाख 91 हजार 500 रुपयांची रोकड काढली. तसंच बँकेने एटीएममध्ये भरणा करण्यासाठी दिलेली रक्कम देखील मशिनमध्ये न भरता स्वत: वापरुन घेतली.
हेही वाचा