Nanded Murder : लग्नाच्या वरातीत गेल्यामुळे नांदेडमध्ये बौद्ध तरुणाची हत्या, हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची प्रकाश आंबेडकरांची मागणी
या हत्येप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केलं आहे.
नांदेड : लग्नाच्या वरातीत काही युवक गेल्यामुळे नांदेड शहरालगत असलेल्या बोंडार गावात 1 जून रोजी रात्री दोन गटात हाणामारी झाली होती. त्यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला आहे. अक्षय भालेराव असं या मृत युवकाचं नाव आहे. या युवकाच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचितचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ही घटना महाराष्ट्राच्या पुरोगामी मुखवट्यावर काळीमा फासणारी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
नांदेड मधील बोंढार हवेली गावात लग्नाच्या वरातीत गेल्यामुळे वाद झाला होता आणि त्यामध्ये एका युवकाची हत्या करण्यात आली होती. त्यावरुन आता वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नांदेड येथील बोंढार गावात अक्षय भालेराव या तरुणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून महाराष्ट्राच्या पुरोगामी मुखवट्यावर काळीमा फासणारा आहे. दोषींवर ॲट्रोसिटी, हत्येचा कट यासकट इतर कलमान्वये कठोर कारवाई तसेच दोषींची मालमत्ता जप्त करण्यात यावी. अक्षय हा वंचित बहुजन…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 3, 2023
दलित तरुणाने आंबेडकर जयंती साजरी करण्यात पुढाकार घेतल्यामुळे सवर्ण तरुणांनी त्याची हत्या केली, असा आरोप माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केला आहे. गुन्हेगारांना अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव या दलित तरुणाने आंबेडकर जयंती साजरी करण्यात पुढाकार घेतल्यामुळे सवर्ण तरुणांनी त्याची हत्या केली, त्याचा मी निषेध करतो आणि गुन्हेगारांना अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे, अशी तमाम बौद्ध समाजाच्या… pic.twitter.com/7zTp6mHIsX
— Dr. Bhalchandra Mungekar (@DrMungekar) June 3, 2023
या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपीना अटक केलीय, गावात सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बोंडार गावात झालेल्या हाणामारीनंतर गावात तणावपूर्ण वातावरण आहे. गावात झालेल्या दगडफेकीत काही वाहनाचे मोठे नुकसान झाले असून त्याचा पंचनामा सुरू आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केलं आहे. या प्रकरणी काही जण सोशल मीडियावर अफवा पसरवत असल्याने हे प्रकरण चिघळण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.
पोलिसांवर दबाब असल्याचा युवा पँथर संघटनेचा आरोप
नांदेड मधील बोंढार हवेली गावात झालेल्या अक्षय भालेराव या युवकाच्या खून प्रकरणात पोलीसांवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर दबाव टाकत असल्याचा आरोप युवा पँथर संघटनेने पत्रकार परिषदेत केला. शिवाय मयत युवकाच्या कुटुंबाला शासनाने पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी, या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावा, हा खटला जलदगती न्यायालयात चालवला आणि शासनाने विशेष सरकारी वकील नेमावा अशा मागण्या युवा पँथर कडून करण्यात आल्या आहेत.