लग्नाच्या 12 दिवसातच विवाहितेचा मृत्यू, हुंड्यासाठी विष पाजवून हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप; नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार
Nanded Crime: सासरकडून माहेरी फोन करून सांगण्यात आलं की, तिला उलट्या होऊ लागल्या आहेत. उपचार सुरू असतानाच 13 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला.

Nanded Crime: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्याभरातून हुंड्यासाठी छळ त्यातून विवाहितांची आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या. हा विषय ताजा असतानाच आता नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. लग्नाच्या अवघ्या 12 दिवसांत विवाहितेला विष पाजून मारल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nanded Crime)
नेमकं प्रकरण काय?
हुंड्यासाठी विवाहितेला विष देऊन मारल्याच्या आरोपाखाली नांदेड मध्ये सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. ताऊबाई चव्हाण (वय 22) असं मृत विवाहितेचं नाव आहे. तिचा विवाह 2 जुलै रोजी राठोडवाडी (ता. मुखेड) येथील सुधाकर राठोड याच्याशी झाला होता. लग्नानंतर नवविवाहिता 7 जुलै रोजी काही काळ माहेरी राहून 8 जुलै रोजी पुन्हा सासरी परतली. मात्र, 9 जुलै रोजी तिच्या सासरकडून माहेरी फोन करून सांगण्यात आलं की, तिला उलट्या होऊ लागल्या आहेत.
सुरुवातीला ताऊबाईवर मुखेड येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला पुढील उपचारांसाठी हैदराबाद येथे हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच 13 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. विवाहितेच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, एकूण 6 लाख रुपयांचा हुंडा ठरला असताना लग्नात 5 लाख रुपये देण्यात आले होते. उर्वरित एक लाख रुपयांसाठी तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केला गेला. अखेर तिला विष देऊन ठार मारण्यात आलं, असं नातेवाईकांचं म्हणणं आहे.
पतीसह सासू सासऱ्यांसह चौघांना अटक
या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात खूण आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान आरोपी पतिसह सासू, सासरे अशा चौघाना अटक करण्यात आली असून विवाहितेला विष पाजन्यात आले का? की तिने स्वतः विष प्राशन केले याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी दिली.
बुधवार पेठेत जाणं पुण्याच्या IT इंजिनिअरला महागात पडलं
अलीकडच्या काळात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या पुण्यात आता लोकांना लुबाडण्याचा नवा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील बुधवार पेठेत (Budhwar peth) वेश्यागमनासाठी (Prostitution) जाणाऱ्या व्यक्तींचे व्हिडीओ चित्रित करुन त्यांना ब्लॅकमेल (Blackmailing) करुन त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. नांदेड सिटी (Nanded City Pune) पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आयुष राजू चौगुले, सदफ पठाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत .
हेही वाचा
























