Nanded Crime : बोगस नर्सिंग कॉलेजच्या नावे शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक; पाच वर्षात एकही विद्यार्थी पास नाही, आर्थिकसह शैक्षणिक वर्षांचे नुकसान
Nanded Crime News : नर्सिंगचा डिप्लोमा पूर्ण करून देतो म्हणून एका बोगस नर्सिंग कॉलेजने जवळपास चारशे विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये समोर आलाय.

नांदेड : नर्सिंगचा डिप्लोमा पूर्ण करून देतो म्हणून एका बोगस नर्सिंग कॉलेजने जवळपास चारशे विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये (Nanded Crime News) समोर आलाय. साल 2020-21 साली या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. पण एकाही विद्यार्थ्यांचा डिप्लोमा पूर्ण झाला नाही. देगलूर येथे समृद्धी कॉलेज ऑफ नर्सिंग व पॅरामेडिकल सायन्स नावाने हे कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये देगलूर तालुक्यातील ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांनी नर्सिंगचा डिप्लोमा पूर्ण करण्याचे स्वप्न पाहून प्रवेश घेतला. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत फीस या कॉलेजच्या संचालकांनी उकळली. मात्र प्रत्यक्षात या कथित कॉलेजने जवळपास चारशे विद्यार्थ्यांची फसवणूक (Crime News)केल्याची घटना उजेडात आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
पाच वर्षात एकही विद्यार्थी पास नाही
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील 3 वर्षात डिप्लोमा पूर्ण होणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना एक वर्षआधी परीक्षेसाठी कर्नाटक राज्यातील बेंगलोर, बिदर, हु्मानाबाद अश्या ठिकाणी परीक्षेसाठी नेण्यात आले. पण परीक्षा रद्द झाल्याचे सांगून त्यांना परत पाठवण्यात आले. वर्षभरापासून विद्यार्थी परीक्षा केव्हा होणार म्हणून विद्यार्थी कॉलेजच्या चकरा मारत आहेत. पण कॉलेजचे संचालक शंकर बाबरे विद्यार्थ्यांना काहीना काही कारण सांगून टाळत आहेत.
गुन्हा दाखल होण्यास टाळाटाळ, राजकीय लोकांचे पाठबळ?
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कागदपत्र ही परत दिले जात नाहीत. अखेर विद्यार्थ्यांनी याबाबत पंधरा दिवसांपूर्वी पोलीस उपधीक्षक आणि उपजिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. पण अजूनही याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नाही. राजकीय लोकांचे पाठबळ या कॉलेजच्या संचालकामागे आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. दरम्यान विद्यार्थ्यांची तक्रार प्राप्त झाली असून चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पोलीसांनी दिली.
मुख्याध्यापकाकडून चिमुकलीचा लैंगिक छळ, मुख्याध्यापकास अटक
यवतमाळच्या दिग्रस येथील शाळेत मुख्याध्यापकाने चिमुकल्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली. विशाल विजयकुमार कुळकर्णी (43) रा. कृष्णभूमी, दिग्रस असे गुन्हा दाखल झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. विद्यार्थिनी केजी 2 ला शिकते. मुख्याध्यापक विद्यार्थिनीचा गत काही दिवसांपासून दररोजच लैंगिक छळ करीत होता. जेवणाची सुटी झाल्यानंतर ऑफिसमध्ये बोलवून अश्लील चाळे करत होता. मुख्याध्यापकाच्या या वर्तणामुळे विद्यार्थिनी घाबरली. तिने झालेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर विद्यार्थिनीच्या आईने पतीला याबाबतची माहिती दिली. मुख्याध्यापकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या

























