Nagpur News: नागपुरात 562 झाडे कापणारा व्यक्ती निघाला जाहिरात कंपनीचा मालक; 5 कामगारांसह मालकाला अटक
Nagpur News : नागपूरच्या रिंग रोड परिसरातील शेकडो झाडांची अक्षरशः कत्तल केलेल्या तब्बल 562 झाडे कापणारा व्यक्ती हा जाहिरात कंपनीचा मालक असल्याचे पुढे आले आहे.

Nagpur News : नागपूरच्या (Nagpur News) रिंग रोड परिसरातील शेकडो झाडांची अक्षरशः कत्तल केल्याच्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणी आता पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत वृक्षांवर कुऱ्हाड चलवणाऱ्याचा शोध घेतला आहे. तब्बल 562 झाडे कापणारा व्यक्ती हा जाहिरात कंपनीचा मालक असल्याचे पुढे आले आहे. विश्वजीत वैरागडे असे कामगारांकडून झाडे कापून घेणाऱ्या आरोपीचे (Crime) नाव असून त्याची जाहिरात एजन्सी आहे आणि तो रस्त्यांवरील विद्युत खांबांवर जाहिरात लावण्याचे काम महापालिकेकडून घेत असल्याचे ही तपासात पुढे आले आहे.
कंपनीच्या मालकासह पाच कामगारांना अटक
या प्रकरणी पुढे आलेल्या माहितीनुसार, आरोपी विश्वजीत वैरागडे रिंग रोडवरील दुभाजकावरील विद्युत खांबावर जाहिरात लावण्याचे टेंडर भरले होते. अजून त्याला काम मिळालेलेही नाही. मात्र हे टेंडर आपल्यालाच मिळेल आणि भविष्यात इथल्या विद्युत खांबांवर आपल्याला जाहिराती लावल्यावर उंच झालेल्या अशोकाच्या आणि पामच्या झाडांचा अडथळा होईल, त्यामुळे आपल्याला व्यावसायिक फायदा मिळणार नाही या दुष्ट हेतूने वैरागडेने काही कामगारांना हाताशी धरून 29 जानेवारी रोजी भर दुपारी एकानंतर एक असे सुमारे अशोकाची 410 आणि पाण्याची 152 झाडे तोडून टाकली. झाडाची उंची कमी राहिली तर आपले जाहिरात फलक लोकांना दिसेल आणि त्यामुळेच आपण भरपूर व्यवसायिक नफा कमवू, या स्वार्थाने 562 झाडांची कत्तल केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी जाहिरात कंपनीचा मालक विश्वजीत वैरागडे आणि त्यांनी झाड कापण्याचे काम दिलेल्या पाच कामगारांना अटक केली आहे.
व्यावसायिक फायद्यासाठी झाडांचा बळी
रस्त्याच्या दुभाजकावरील तब्बल 562 झाडे तोडण्यात आल्याच्या घटनेने सर्वत्र संतापाची लाट पसरली. तर दुसरीकडे झाडांच्या अवैध पद्धतीने केलेल्या कापणीबद्दल पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करत तपासाचे चक्र गतिमान केले आणि आरोपीचा अखेर शोध घेतला. यात पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. होर्डींग व इतर फलक लोकांना दिसावे आणि त्यामुळे व्यावसायिक फायदा व्हावा या स्वार्थामुळे झाड निर्दयीपणे कापण्यात आल्याचे पुढे आले आहे. या घटनेचा व्हिडिओ परिसरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर या फुटेजच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी झाड कापणाऱ्या मजुरांची ओळख पटवली आणि त्याला बोलावून त्यांची चौकशी ही केली. त्यानंतर त्याने झाड कापण्याचे निर्देश देणाऱ्या कंत्राटदाराची माहिती पोलिसांना दिली असून त्या कंत्राटदाराला आता अटक करण्यात आले आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
