Nagpur News : पुरुषोत्तम पुट्टेवार हिट अँड रन सुपारी किलिंग प्रकरणी आणखी एक खुलासा समोर; महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती
Nagpur News : पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरेल, असा अर्चना पुट्टेवार यांचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात पोलिसांना (Nagpur Police) यश आलं आहे.
Nagpur Accident News नागपूर : नागपूर शहरातील (Nagpur Accident) हिट अँड रन सुपारी किलिंग प्रकरणी दिवसागणित एका पाठोपाठ एक असे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरेल, असा अर्चना पुट्टेवार यांचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात पोलिसांना (Nagpur Police) यश आलं आहे. या मोबाईल फोनच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे खुलासे या प्रकरणात होण्याची शक्यता आहे. अर्चना पुट्टेवार यांची सहकारी आणि या प्रकरणात एक संशयित आरोपी असलेली पायल नागेश्वरच्या माहितीवरून पोलिसांनी हे मोबाईल फोन हस्तगत केले आहे.
जेव्हापासून पोलिसांनी या प्रकरणात मास्टरमाइंड म्हणून अर्चना पुट्टेवारला अटक केली होती, तेव्हापासूनच अर्चना यांनी त्यांचा मोबाईल फोन गायब केला होता. अनेक प्रयत्न करूनही तो मोबाईल फोन पोलिसांना मिळू शकत नव्हता. मात्र, आता तो मोबाईल फोन पोलिसांना मिळाल्यामुळे या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचे खुलासे फोनमधील रेकॉर्डच्या आधारे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपासाला आता वेगळे वळण प्राप्त झाले आहे.
महागड्या पार्ट्यांमुळे फुटलं प्रकरणाचं बिंग
22 मे रोजी नागपुरात एक अपघात घडला. एका भरधाव गाडीनं रस्त्यावरुन जाणाऱ्या एका 82 वर्षीय वृद्धाला उडवलं. हिट अँड रनची केस असल्याचं मानून पोलिसांनी याप्रकरणी अपघाताची नोंद केली आणि तपास बंद केला. पण ते म्हणतात ना, सत्य कधी ना कधी तरी समोर येतंच. असंच काहीसं या प्रकरणात झाल्याचं पाहायला मिळालं आणि अखेर या सुनियोजित कटाचं बिंग फुटलं. पण या प्रकरणाचं भिंग पुटण्यासाठी कारणीभूत ठरल्या काही पार्ट्या. हो काही पार्ट्यांमुळे या प्रकरणाचं बिंग फुटलं.
कधीही कोणत्याही मित्राला दारू न पाजणारा, कधी ही मित्रांना पार्ट्या न देणारा आणि नेहमीच लोकांकडून पैसे उसने मागणारा नीरज निमजे अचानक मित्रांना पार्ट्या देऊ लागला, दारूचे महागडे ब्रँड ऑफर करू लागला. त्यामुळे काहींना त्याच्यावर शंका आली. खबऱ्यांमार्फत चिल्लर गुन्हेगार असलेल्या नीरज निमजेकडे अचानक भरपूर पैसा आल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि पोलीस कामाला लागले.
सुनियोजित हत्या केल्याची कबुली
पोलिसांनी निरजच्या अवतीभवती खबरी पेरले. एका अपघाताच्या प्रकरणातून नीरज निमजेकडे भरपूर पैसे आल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगानं हलवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कुठे अपघाताचं प्रकरण घडून अजूनही आरोपी चालक सापडलेले नाही, याची माहिती घेणं सुरू केलं आहे. तेव्हा बालाजीनगर भागातील पुरुषोत्तम पुट्टेवार यांचं प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी नीरज निमजेला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला आणि पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू अपघाती नसून सुनियोजित हत्या केल्याची कबुलीच नीरज निमजेनं दिली. त्यामुळे एका भुरट्या गुन्हेगारानं दिलेल्या काही महागड्या पार्ट्या अपघातातून घडवलेल्या हत्येचा प्रकरण सर्वांसमोर आणण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या