Nagpur Crime : पोलिसांची धाड पडली अन् जुगाऱ्याने पहिल्या माळ्यावरुन उडी मारली, उपचारादरम्यान मृत्यू
खैरीपुऱ्यात राहणाऱ्या बिनेकर परिवार हा जुगारअड्डा चालविण्याचा व्यवसाय करीत होता. घराच्या खाली मूलचंद सावजी भोजनालय चालायचा आणि वरच्या माळ्यावर जुगार अड्डा चालवीत होता.
नागपूरः नागपुरातील खैरीपुर भागात सावजी भोजनालयाच्या वरच्या माळ्यावर जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पाचपावली पोलिस जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेले. त्यात 55 वर्षीय आरोपीने लघुशंका आल्याचे सांगत पहिल्या माळ्यावरुन उडी टाकली. गंभीर जखमी झाल्याने मूलचंद यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मूलचंद बिनेकर असे मृत आरोपीचे नाव असून तो खैरीपुरा परिसरात राहत होता. खैरीपुऱ्यात राहणाऱ्या बिनेकर परिवार हा जुगारअड्डा चालविण्याचा व्यवसाय करीत होता. घराच्या खाली मूलचंद सावजी भोजनालय चालायचा आणि वरच्या माळ्यावर जुगार अड्डा चालवीत होता.
खैरीपुऱ्यात पोलिस ताफ्यासह आले. यावेळी त्यांनी पहिल्या माळ्यावर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. तसेच चार ते पाच आरोपींना अटक केली. दरम्यान मूलचंद बिनेकर यांनी लघुशंका आल्याचे सांगितले. त्यामुळे त्या माळ्यावर असलेल्या टॉयलेटमध्ये पोलिसांसह ते गेले. यावेळी पोलिस सोबत असताना मूलचंद बिनेकर याने हात झटकत थेट पहिल्या माळ्यावरुन गॅलरीतून उडी टाकली. अचानक झालेल्या या घटनेने अनेकांना धक्काच बसला. पोलिस धावत खाली आले. यावेळी मूलचंदच्या डोक्याला व हातपायाला जबर दुखापत झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पुतण्याचाही जुगाराच्या वादातून खून
दोन वर्षांपूर्वी 27 सप्टेंबर 2020 रोजी बोलो पेट्रोल पंप चौकात बुलेटवरुन येत काही तरुणांनी सिनेस्टाईल पद्धतीने भरचौकात कारमध्ये बसलेल्या कुख्यात बाल्या बिनेकरची हत्या केली होती. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने ती सर्वत्र व्हायरल झाली होती. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली होती. बाल्या मुलचंदचा पुतण्या असून तोही जुगार अड्डा चालवायचा. त्यातूनच झालेल्या वादातून त्याचा खून झाला होता हे विशेष. या घटनेच बोले पेट्रोलपंप चौकात सिग्नलवर बाल्याची कार थांबली असताना एका इसमाने त्याच्या गाडीसमोर बुलेट लावली आणि इतर दोघांनी त्याच्या गाडीच्या काचा फोडून त्याला गाडीत जाऊन त्याच्यावर सपासप वार करुन त्याचा खून केला होता. तसेच अनेक वार केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला की नाही, हे देखील तपासून मारेकऱ्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला होता.