Nagpur Crime News: सिगारेट ओढताना व्हिडीओ काढल्याने महिलेचा राग अनावर, मित्रांना बोलावून तरुणाची हत्या, नागपूर हादरलं!
Nagpur Crime News : सिगारेट ओढताना व्हिडिओ घेतल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन तरुणींनी आपल्या मित्रांच्या मदतीने एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याची हत्या केलीय.
Nagpur News नागपूर : सिगारेट ओढताना व्हिडिओ घेतल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन तरुणींनी आपल्या मित्रांच्या मदतीने एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याची हत्या (Crime) केलीय. ही खळबळजनक घटना हुडकेश्वर पोलीस (Nagpur Police) ठाण्यांतर्गत येणाऱ्या महालक्ष्मी नगरमध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. रणजित बाबूलाल राठोड (वय 28 वर्ष, रा. ज्ञानेश्वर नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर जयश्री दीपक पानझारे (वय 30 वर्ष, रा. नंदनवन), सविता यशवंत सायरे (वय 24 वर्ष, रा. आंबेडकर नगर, वाडी) आणि आकाश राऊत (वय 26 वर्ष, रा. विजयालक्ष्मी पंडित नगर, नंदनवन) असे या प्रकरणातील संशयित आरोपींची नावे आहेत. या घटनेचा संपूर्ण थरार परिसरात लागलेल्या सीसीटीव्हीत चित्रित झाला असून, पोलिसांनी या प्रकरणी दोन तरुणींसह तीन संशयित आरोपींना अटक केली आहे.
सिगारेट ओढतांना व्हिडिओ घेतल्याच्या वादातून तरुणाला संपवल
या प्रकरणातील मृत तरुण रणजितचे कपड्याचे दुकान आहे. रणजित 6 एप्रिलच्या रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास सिद्धेश्वर सभागृहाजवळ असलेल्या पानठेल्या जवळ उभा होता. दरम्यान, त्या ठिकाणी जयश्री ही आपल्या मैत्रीण सविता सोबत तेथे आली आणि तेथून सिगारेट विकत घेतली. त्यानंतर त्या दोघी त्याच ठिकाणी सिगरेट ओढत होत्या. दरम्यान यावेळी तेथे उपस्थित असलेल्या रणजितने कुतूहलाने जयश्रीकडे पाहिले तसेच सिगारेट ओढनाऱ्या जयश्रीचा व्हिडिओही त्याने घेतला. तसेच तो तिच्याकडे एकटक पाहत असल्याचा आरोपही जयश्रीने केला होता. यावरून दोघात वाद होऊन जयश्री आणि सविताने रणजितला शिवीगाळ सुरू केली.
त्यानंतर जयश्रीने तिच्या आणखी काही पुरुष मित्रांना फोन करून घटनास्थळी बोलावले. त्यानंतर त्या दोघींनी मित्र आकाशच्या मदतीने रणजितला जाब विचारला असता, दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. त्यानंतर त्यांच्यात शिवीगाळ सुरू होऊन हा वाद विकोपाला गेला. दरम्यान, आकाश आणि त्याच्या इतर साथीदारांनी मिळून रणजितवर धारधार शस्त्र आणि दगडांनी हल्ला केला. या हल्ल्यात रणजित गंभीर जखमी झाला असल्याचे बघून मारेकऱ्यांनी घटणास्थळावरून पळ काढला.
सीसीटीव्हीमुळे सत्य आले समोर
दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळातच त्यांनी तात्काळ घटणास्थळ गाठून जखमी रणजितला रुग्णालयात नेले. मात्र, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली असता, या परिसरात लागलेले सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्ही पाहिल्यावर घडलेला संपूर्ण प्रकार स्पष्ट झाला. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी दोन तरुणींसह तीन संशयित आरोपींना अटक केली असून, पुढील कारवाई पोलीस करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या