Nagpur: 'मी काहीही चोरलेले नाही..., मात्र, तुम्ही भिकारी'; घरी काही मुद्देमाल न मिळाल्याने चोरांचा चिठ्ठीतून संताप व्यक्त
चोरीच्या उद्दिष्टाने घरात शिरलेल्या मात्र काहीही मुद्देमाल न मिळाल्याने नाराज चोराने घरात चिठ्ठी सोडत त्याचा संताप व्यक्त केला.
नागपूर: शहरातील हुडकेश्वर भागात एका चोरट्याने कुलूप बंद घरात चोरीचा करण्याचा बेत आखला, 20 फेब्रुवारीच्या मध्यरात्री त्या चोराने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र, घरात तीन हजार रुपयांच्या व्यतिरिक्त काहीही किंमती ऐवज त्याच्या हाती लागला नाही, त्यामुळे चिडलेल्या चोराने एका कागदावर "मी काहीही चोरलेले नाही, भिकारी" असं लिहून आपला संताप व्यक्त केला आणि पळ काढला.
संबंधित कुटुंब 23 फेब्रुवारीच्या रात्री पंढरपूरवरून नागपूरला परतले. त्यांना घराचा मुख्य दरवाजा तोडलेला तर घरातल्या सर्व वस्तू विखुरलेल्या अवस्थेत आढळल्या. घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या कुटुंबाने चोरट्यांनी घरातून काय चोरून नेले आहे याचा अंदाज घेतला. चोरट्याने घरातल्या कपाटामध्ये ठेवलेले 3000 रुपये नेल्याचं लक्षात आले.
याच शोध मोहिमेत पीडित कुटुंबाला चोरट्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी ही आढळली. 'मी काहीही चोरले नाही, भिकारी...' हे शब्द त्या चिठ्ठीवर वाचल्यानंतर आपण चोराच्या प्रामाणिकपणावर हसावे की आपल्या कमकुवत आर्थिक परिस्थितीवर रडावे हेच त्या कुटुंबाला समजले नाही.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी पीडित कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी पीडित कुटुंबाच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चिठ्ठीच्या माध्यमातून आपला संताप आणि व्यथा व्यक्त करणाऱ्या आगळ्यावेगळ्या चोराचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. अद्याप चोराला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.
(संबंधित कुटुंबाची बदनामी होऊ नये, म्हणून पोलिसांनी त्या कुटुंबाचे नाव आणि त्यांच्या घरचा पत्ता सांगितलेलं नाही).
महत्त्वाच्या बातम्या:
- Mahavikas Aghadi ahitation : नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाई विरोधात महाविकास आघाडीचे नागपुरात आंदोलन, सहभाग फक्त राष्ट्रवादीचाच
- Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सभेतील 'कूपन'चे रहस्य! पटोलेंची पाठ फिरताच वेगळेच चित्र कॅमेऱ्यात कैद
- कार चालवताना झोप येतेय? चिंता करू नका, नागपुरातील तरुणाने शोधून काढला एक अफलातून उपाय!