Nagpur Crime : चक्क घरफोडी करून घेतली नवी कोरी कार; मात्र हौस पूर्ण होण्यापूर्वीच तुरुंगवास
Nagpur Crime News: एका युवकाने कारमध्ये फिरण्याची हौस पूर्ण करण्यासाठी शहरात घरफोडी करण्याचे पाऊल उचलले. मात्र हेच पाऊल अत्यंत महागात पडले आहे.
नागपूर : कुठल्याही गोष्टीची हौस असणे हे अगदी स्वाभाविक आहे. आपल्या परीने जो तो ही हौस पूर्ण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत असतो. मात्र आपली हौस पूर्ण करण्यासाठी कोणी घरफोडी (Nagpur Crime) करण्याचे धाडस करणार नाही. मात्र असाच एक धक्कादायक प्रकार नागपूरात (Nagpur)उघडकीस आला आहे. ज्यामध्ये एका युवकाने कारमध्ये फिरण्याची हौस पूर्ण करण्यासाठी शहरात घरफोडी करण्याचे पाऊल उचलले आहे. मात्र हीच हौस त्याला अतिशय महागात पडली असून कारमध्ये फिरण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी (Nagpur Police) जेरबंद केलं आहे.
हौस पूर्ण करण्यासाठी चक्क घरफोडी
मध्यप्रदेश येथील हुंडा, शिवनीचा रहिवासी असलेला 24 वर्षीय संदिप खेमचंद्र टेंभरे असे या तरुणाचे नाव असून त्याने नागपूरात घरफोड्या करून मिळालेल्या रक्कमेतून त्याने चक्क क्रेटा कार खरेदी केली. मात्र अल्पावधीतच नागपूर गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने त्याला गजाआड करून खरेदी केलेली क्रेटा कारसह त्याला आपल्या ताब्यात घेतले आहे. 28 डिसेंबर 2023 ला प्रियंका आशिष जांगडे (31, रा. थ्री स्टार हाऊसिंग सोसायटी, चेतन्येश्वरनगर, वाठोडा) या आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबासह बाहेरगावी गेल्या होत्या.
दरम्यान, या संधीचा फायदा घेत एका अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील लोखंडी आलमारीतील सोन्याचे दागीने ज्याची किंमत 4 लाख पेक्षा अधिक होती ते चोरी केले. त्यानंतर जांगडे कुटुंब घरी आल्यानंतर त्यांना घडलेला प्रकार कळाला असता त्यांनी तत्काळ वाठोडा पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार सांगितला आणि रितसर तक्रार नोंदवली. त्यांनतर पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला.
संशयित अखेर जेरबंद
शहरात होणाऱ्या चोरी आणि घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी नागपूर शहर पोलिसांच्या वतीने गुन्हे शाखेचे घरफोडी विरोधी पथक तयार करण्यात आले आहे. त्यांच्या मार्फत या गुन्ह्याच्या समांतर तपास सुरू करण्यात आला असता तपासात गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि अंमलदारांना गुप्त माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या या गुप्त माहितीवरून पोलिसांनी एका संशयित आरोपीला सापळा रचून अटक केली. चौकशी दरम्यान त्याने खरे उत्तर देण्यास टाळाटाळ केली, मात्र पोलिसांनी जरा दम भरला असता त्याने सत्य सांगण्यास सुरुवात केली.
पकडण्यात आलेल्या संशयित आरोपी संदिपने नागपुरात घरफोडीची कबुली दिली. ज्यामध्ये त्याने वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 जानेवारी 2024 ला संजय महादेव नाकाडे (44, रा. जिजामातानगर) यांच्याकडे आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. या चोरीमध्ये संशयित आरोपीने चोरी केलेले सोन्याचे दागीने ओम शर्मा (रा. शिवाजीनगर, गंगाबाई घाट) याच्या मार्फत तुषार कावडे (रा. लालगंज शांतीनगर) याला विक्री केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने मिळालेल्या रक्कमेतून होंडा कंपनीची क्रेटा कार (गाडी क्रमांक एम. एच. 31 ई. यु. 7368) खरेदी केल्याचे संदिपने सांगितले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून क्रेटा कार जप्त करून त्याला जेरबंद केले आहे. सोबतच या गुन्ह्यात त्याला मदत करणारे इतर दोन संशयित आरोपी ओम, आणि तुषार यांचा शोध सध्या पोलीस घेत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या