Nagpur Crime News: शहरात हत्यासत्र सुरूच! पाच दिवसांत चार खून; उपराजधानीत चाललंय तरी काय?
Nagpur Crime News: उपराजधानी नागपूर शहरात एकापाठोपाठ एक हत्यांचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यातील पाच दिवसांत चार खुनाच्या घटनेने शहर हादरले आहे.
Nagpur News नागपूर: उपराजधानी नागपूर शहरात एकापाठोपाठ एक हत्यांचे (Nagpur Crime News) सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यातील पाच दिवसांत चार खुनाच्या घटनेने शहर हादरले आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी विश्वात कायदा आणि पोलिसांचा (Nagpur Police) धाक संपला आहे का, असा प्रश्न या निमित्याने उपस्थित झाला आहे. त्यामागील कारण म्हणजे, वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या ऑरेंज नगरमध्ये रविवारी रात्री आणखी एका तरुणाच्या हत्येची (Crime News) नोंद झाली आहे. शेख फिरोज उर्फ पक्या शेख सत्तार (वय 22) असे मृतकाचे नाव आहे. तर परिसरातील वर्चस्वाच्या लढाईतून हा खून झाला असल्याचा प्रथमिक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Nagpur Police) दोन संशयितांना अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.
पाच दिवसांत चार खून
नवीन पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील विविध हत्येच्या घटनांनी शहरात खळबळ उडाली आहे. या निमित्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा परत एकदा चर्चेला आला आहे. या महिन्यात झालेल्या चार हत्यापैकी दोन हत्या एकट्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतच झाल्या आहेत. वर्चस्वासाठी झालेल्या भांडणातून परिसरात राहणाऱ्या दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांनी शेख फिरोज वर धारदार शस्त्राने वार करून रात्री त्याची हत्या केली. शेख फिरोज हा देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचाच होता आणि शहरातील दोन पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्ह्यांची नोंद होती.
रविवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास तो घराबाहेर गेला. मात्र मध्यरात्री नंतर देखील तो घरी परतला नाही. त्याच्या कुटुंबियांनी त्याचा परिसरात शोध घेतला. मात्र तो त्या रात्री त्याचा संपर्क होऊ शकला नाही. नंतर सोमवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास त्याची पत्नी कुटुंबीयांसह त्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडली असता तो परीसरात असलेल्या स्मित बारच्या मागील गल्लीत एका मोकळ्या प्लॉटमध्ये आढळून आला. त्यावेळी तो जखमी अवस्थेत असून त्याच्या डोके, जबडा, छाती, पोट आणि पाठीवर शस्त्राचे वार होते. गंभीर जखमी असलेल्या फिरोज मृत असल्याचे निदर्शनात आले.
संशयित आरोपींना हॉटेलमधून अटक
त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. फिरोजच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असता प्रकरणातील मारेकरी याच परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना वाठोडा परिसरामधील ओयो हॉटेलमधून अटक केली. पकडण्यात आलेले संशयित आरोपींमध्ये सुमित साखरकर आणि प्रणय सरकार यांचा समावेश असून त्यांची सखोल चौकशी सध्या सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या